About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

23 मार्च 18, हुतात्मा भगतसिंग यांच्या बलिदान दिनी झालेल्या बेळगावातील व्याख्यानाचा वृत्तांत

दि 23 मार्च हा हुतात्मा भगतसिंग सुखदेव अन् राजगुरू यांच्या हौतात्म्याचा दिवस. त्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम, बेळगाव येथील अ भा वि प च्या कार्यकर्त्यांनी आयोजिला आणि प्रमुख वक्ती म्हणून मला आमंत्रिलं.
सत्यार्थप्रकाश वाचनाचा प्रकल्प लवकरच सुरू करायचा असल्यामुळे मला थोडी व्यस्तता होती तरी या थोर हुतात्म्यांना श्रद्धांजली वहाणं आणि त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हे कर्तव्य मानून मी निमंत्रण स्वीकारलं.
कर्नाटकात होऊ घातलेल्या निवडणुका, त्या संबंधीचं वातावरण या विषयीपण कुतूहल होतं. बेळगाव सारख्या सीमावर्ती नगरात मराठी आणि कन्नड मंडळींना भेटता येईल , त्यांचं मनोगत ऐकता येईल हा पण विचार होता. आमंत्रण स्वीकारलं आणि 23 मार्चच्या भल्या सकाळी बेळगावी (म्हणजे बेळगावात) येऊन पोहोचले.
सेठ कुटुंबीयांकडे अल्पोपहार घेऊन लगेच बेळगाव दर्शनाला निघाले. समवेत असलेले अभाविपचे तीन कार्यकर्ते मोठ्या आपुलकीनं सर्व माहिती सांगत होते. कन्नडिग असूनही ते मराठी उत्तम बोलत होते.
एखाद्या विस्तीर्ण वनराईत तिचं वनराई हे रूप पालटू न देता एखादं नगर वसवलं तर कसं दिसेल, तसं मला बेळगाव वाटलं. बेळगाव स्थानकाकडे गाडी येत असता एक प्रदीर्घ भुईकोट किल्ला लागला, त्याची ती लांबच लांब तटबंदी (rampart) आणि तटबंदीला लागून असलेला तितकाच प्रदीर्घ खंदक शेकडो वर्षांनंतरही तसाच्या तसाच होता. आणि आश्चर्य म्हणजे मार्चचा शेवट आला तरी त्यात पाणीही होतं.
आम्ही प्रथम त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारी आलो, तिथे दुर्गेचं मंदिर आहे. अर्थात ही दुर्गा आहे रणदुर्गा कारण मंदिरावरचा फलकच आहे,
'मिलिटरी दुर्गा मंदिर' तिथे आणखी एक 'मिलिटरी महादेव मंदिर' ही पाहिलं. तो भाग आणि बेळगावचा बराचसा भाग सैन्याच्या कह्यात आहे.
इथे अवतीभवती असलेल्या खेड्यांमधील वस्ती जवळ जवळ शतप्रतिशत मराठी आहे आणि तिथे घराघरातून तरुण सैन्यात जाण्याची परंपरा आहे बहुधा म्हणूनच ब्रिटिशांनी तिथे एवढा मोठा सैनिकी तळ उभारला असावा.
ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध असलेली 'मराठा लाईट इन्फंट्री' मूळची इथलीच. अलिकडे सैन्यानं केलेल्या शस्त्रक्रियासदृश आघाताचं
(surgical strike) कठोर प्रशिक्षण इथेच दिलं गेलं.
आतमध्ये शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. अवतीभवती महाराजांच्या अनेक दुर्गांच्या प्रतिकृती आहेत, त्यात एक पावनखिंडीची पण प्रतिकृती आहे. मुख्य देवाच्या मूर्तीभोवती शंख घंटा आणि इतर उपकरणी ठेवावी तसं एक देवघरासारखं दृश्य दिसलं ते. महाराजांना वंदन केलं आणि कधी न कधी भोवतीच्या त्या मराठी बहुल कर्नाटकी खेड्यांना भेट द्यायचा मी निश्चय केला.
तिथून पुढे एका आठ नऊशे वर्षे प्राचीन असलेल्या आणि शिल्पकलेचा अगदी उत्कर्ष असलेल्या कमलबस्ती या जैन मंदिरात गेले. जैनांचे तीर्थंकर नेमिनाथ यांचं ते मंदिर, तीर्थंकर नेमिनाथांची काळ्या पाषाणाची भव्य मूर्ती तिथे आहे. मंदिराच्या प्राकारात छतावर उलट्या टांगलेल्या सहस्रदल कमलाची दगडात कोरलेली आकृती आहे. खरं म्हणजे ते एक भव्य झुंबरच टांगलं आहे असा भास होतो.
दगडात इतकी सूक्ष्म अन् त्याचवेळी इतकी भव्य   कलाकुसर मती गुंग करणारी आहे. मी हात जोडले, जैनांना पवित्र असलेला णमोकार मंत्र म्हटला तीर्थंकरांबरोबर मी त्या अदृश्य अन् अज्ञात शिल्पकारांनाही वंदन केलं . त्या परिसरात तशी सहा मंदिरं होती पण त्यातली पाच जिहाद्यांनी नष्ट केली आणि हे एकच वाचलं असं समजलं.
त्याच परिसरात एक ब्रिटिश काळातलं आणि त्या शैलीचं एक भरभक्कम घर आहे तिथे कुणी हरिपाद मित्र या नावाचे वनाधिकारी (forest officer) रहात होते. इ.स. 1892 मध्ये स्वामी विवेकानंद त्या घरी नऊ दिवस राहिले होते. आता ते घर स्वामीजींचं स्मारक म्हणून विकसित केलय. तिथला त्यांचा पुतळा त्याच्या अगदी बोलक्या डोळ्यांमुळे जिवंत वाटतो.
शेजारी रामकृष्ण मठ आहे. वास्तू खूपच मोठी आहे, तिचं उद्घाटन सोनियानं केलय. तिनं त्यावेळी काय भाषण केलं असेल हा विचार मनात आला आणि मनाची थोडी करमणूक झाली.
बेळगावला एक भला थोरला तलाव आहे, ठाण्याच्या तलावपाळीच्या पाच सहापट तरी मोठा असावा, इतका की त्याच्या मध्यभागी दाट झाडी असलेलं एक बेट आहे, त्या तलावाच्या काठी आम्ही गेलो. तिथे नुकतीच एक भारतीय स्तरावर उच्चांक गाठणारी एक स्थापना झाली आहे.
ती आहे आपल्या तिरंगी ध्वजाची. वाघा सीमेवर उभारलेल्या सर्वोच्च ध्वजाहूनही अधिक उंचीच्या स्तंभावर इथे तिरंगा फडफडतो आहे.
बेळगावचा बुद्धविहारही खूप मोठा आहे, तिथे जाऊन मी तथागतांना वंदन करून आले.
संध्याकाळी बेळगाव मधील मिलेनियम गार्डन्च्या रम्य अन्  विस्तीर्ण प्रांगणात भव्य
मंचावर मानवंदनेचा कार्यक्रम सुरू झाला. मागे पटलावर मंचावरील सोहळा प्रक्षेपित होत होता.
प्रथम पीठावर सात आठ मुली कर्नाटक गीत गायल्यात. गीताच्या आरंभी समोरील शेकडो श्रोते , राष्ट्रगीताच्या वेळी आपण उभे राहतो तसे उभे राहिलेत. ते गीत मुलींनी अगदी सुरेलपणे म्हटलं. गीत कन्नड भाषेत असूनही रचनेतल्या संस्कृतप्रचुरतेमुळे मला त्याचा आशय समजला आणि ते गीत मला खरोखर आवडलं. त्यात कर्नाटकात होऊन गेलेल्या अनेक थोरांचा गौरव होता. मध्ययुगात होऊन गेलेले जणू दुसरे व्यासच असलेले कन्नड महाकवी कुमारव्यास हिंदुसाम्राज्याची स्थापना करणारे 'सर्वज्ञः स हिंदू माधवः' अशी ज्यांची कीर्ती होती, असे शंकराचार्यांच्या पीठावरील स्वामी विद्यारण्य यांच्या त्या गीतातील उल्लेखानं मीही भारावून गेले.
दक्षिणेतले लोक त्यांच्या भाषेचं मातृत्व संस्कृतला देत नाही अर्थात त्यांच्या मते त्यांच्या भाषा संस्कृतोद्भव नसल्या तरी मला त्या निदान संस्कृतप्रभावित तरी वाटतात.
कर्नाटक गीतातला पहिलाच चरण आहे,
  "भारतजननिय तनुजा ते
   जय जय कर्नाटक  माते"
या चरणातला जननिय मधला य हा कन्नड भाषेतला षष्ठी विभक्ती प्रत्यय सोडला तर सर्वच शब्द संस्कृत आहेत आणि तो 'य' हा प्रत्ययही तशाच संस्कृत 'स्य' चा अपभ्रंश असू शकतो असा विचार माझ्या मनात आला.
त्यानंतर तिथल्या काही वक्त्यांची छोटी छोटी भाषणं कन्नडमध्ये झालीत.
व्यासपीठावर अडविसिद्धेश्वर मठ कुंदरगीचे अमरेश्वर स्वामी, तेथील मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा वीणा लोकूर , विधान परिषद सदस्या आणि अभिनेत्री तारा अनुराधा आणि इतर मान्यवर होते. मराठी आणि कन्नड असा संमिश्र श्रोतृवर्ग असल्यामुळे माझं मराठी भाषण कन्नड श्रोत्यांना कितपत समजेल अशी मला शंका होती पण तेथील कन्नड भाषिकांना मराठी उत्तम समजतं अशी माहिती मिळाली आणि प्रत्यक्ष भाषणात सर्वच श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिसादातून त्याचा प्रत्ययही आला.
हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचं महच्चरित्र उलगडतांना एकंदरितच क्रांतिकारकांचं भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान आणि त्यांची स्वातंत्र्यानंतर झालेली अपराधी उपेक्षा मी भाषणात अधोरेखित केली.
माझ्या नंतर अमरेश्वर स्वामींचं कन्नड मध्ये भाषण झालं .
मला ते समजत नसलं तरी माझ्या भाषणाचा उल्लेख करीत त्या ओघात आणि संदर्भात ते बोलताहेत असं मला वाटलं आणि नंतर मी भाषणाचा सारांश विचारला असता माझी समजूत बरोबर असल्याचं लक्षात आलं.
या स्वामींच्या भाषणाचा त्वेष अन् आवेश मला ती भाषा समजत नसतांनाही प्रभावित करून गेला.
कार्यक्रमानंतर रात्री प्राचार्य सुशांत जोशींकडे भोजन घेतलं आणि बेळगावकरांना
'धन्यवादगळु' (अनेक धन्यवाद)  देऊन त्यांचा निरोप घेतला.
-गीता चारुचंद्र उपासनी.


No comments:

Post a Comment