About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

About Geeta Upasani

गीता उपासनी हिचा जन्म गेल्या पिढीत कीर्तनकार प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या निजामपुरकर घराण्यात झाला. तिचे आजोबा पण्डित राधाकृष्णशास्त्री उपासनी निजामपुरकर, हे विख्यात प्रवचनकार आणि संस्कृत पंडित होते.
गीताच्या मातोश्री सौ वीणा उपासनी आणि वडील श्री चारुचंद्र उपासनी दोघेही गणिताचे प्राध्यापक..
गणित आणि काॅम्प्यूटर सायन्स या विषयात गीतानी एम् एस् सी पर्यंत प्रथम श्रेणी मिळवली आहे.

तिच्या वडिलांनी ती केवळ चार वर्षांची असतांना  श्रीमद्भागवतातील दशमस्कंधातील वेदस्तुती हे पठणाला अत्यंत अवघड प्रकरण तिला पाठ म्हणायला शिकवलं. ही वेदस्तुती चौतीस अक्षरांच्या नर्दटक नावाच्या अवघड अन् दुर्मिळ वृत्तात भगवान व्यासांनी समाधि अवस्थेत रचली आहे असं मानलं जातं. सर्व अठरा पुराणात हे वृत्त या एकाच ठिकाणी भगवान बादरायण व्यासांनी योजलं आहे.
ही वेदस्तुती अकरा मात्रांच्या तालात विशिष्ट पद्धतीने म्हणण्याची एक परंपरा होती. ती आता इतकी लुप्त झाली आहे की ती या पद्धतीनं म्हणणार्या बहुधा दोनच व्यक्ती असाव्यात आणि त्या म्हणजे, गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी आणि स्वतः गीता..!

या वेदस्तुतिपठणाचे गीताचे अनेक कार्यक्रम झालेत. पहिला कार्यक्रम, ती चार वर्षाची असतांना , बाळासाहेब ठाकर्यांच्या सभेत अडीच लाख लोकांसमोर झाला. या पठणाचं बाळासाहेबांना इतकं कौतुक वाटलं की त्यांच्या गळ्यातला हार काढून त्यांनी या चिमुरड्या बालिकेला घातला. पुढे ही वेदस्तुती जेंव्हा उस्ताद झाकीर हुसेन यांनी ऐकली तेंव्हा तिच्यातल्या अचूक तालबद्धेतेनं ते तालसम्राट स्वतःच मंत्रमुग्ध झालेत , त्यांची बोटं आपोआप ताल धरू लागलीत , मान तालात डोलू लागली,  ते गीताला म्हणालेत की ' तुझं हे सुंदर पठण मला इतकं आवडलं आहे की येत्या वर्षी तीन फेब्रुवारी 2015 ला माझ्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे खूप मोठा दिवसभराचा संगीताचा कार्यक्रम आहे. त्याला देशोदेशीचे महान कलाकार येतात आणि त्यांचे कार्यक्रम सादर करतात. हजारो रसिकांसमोर हा उत्सव होतो. या वर्षी या उत्सवाचं उद्घाटन तुझ्या वेदस्तुतीनं व्हावं अशी माझी इच्छा आहे."
त्यांच्या निमंत्रणाप्रमाणे गीताचा कार्यक्रम , षण्मुखानंद सभागृहात झाला, एकीकडे उस्ताद झाकीर हुसेन यांचे लहान बंधू फझल कुरेशी तालाचे बोल म्हणताहेत आणि दुसरीकडे गीताची वेदस्तुती त्याच तालात आणि सामान्य माणसाची बोबडी वळेल अशा अवघड प्रौढ अस्खलित संस्कृत मध्ये सुरू आहे. हा देवदुर्लभ कार्यक्रम अवघा सोळा मिनिटं चालला, पण तो संपला आणि हजारो श्रोत्यांनी उभ्यानं टाळ्या वाजवून कार्यक्रमाला दाद दिली.

ही वेदस्तुती सादर करतांना, गीता , श्रोत्यांना नेहेमी आवाहन करते की त्यांनी मनात एक सत्संकल्प करावा , देशाधर्माविषयीच्या प्रीतीनं एक निश्चय करावा आणि ही वेदस्तुती तन्मयतेने ऐकावी. तुमचा हा निश्चय दृढ अन् दृढतर होण्यासाठी या श्रवणाचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिवचरित्राचा अनोखा प्रचार गीतानी केला आहे.
बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्राची केवळ दोन पानं वाचून, ती मोबाईलवर ध्वनिमुद्रित करून रोज  तीन हजार जणांना ते शिवचरित्र पाठवी. हा प्रयोग एक जानेवारी 2016 पासून सुरू झाला, शिवचरित्राचे 365 भाग केलेत.  हा प्रकल्प 31 डिसेंबरला संपला. या तीन हजार श्रोत्यांमुळे हे शिवचरित्र पुढे लाख्खो लोकांपर्यंत पोहोचलं आहे.
आता याच पद्धतीनं गीता सावरकर वाड़्मय स्वतःच्या आवाजात तेरा हजार लोकांना पाठवत आहे आणि तिच्या कडून ते देशात आणि देशाबाहेर लाख्खो लोकांपर्यंत जात आहे. खरोखर गीतामुळे सावरकर साहित्य आणि त्यातून थोर देशभक्तीचा उज्ज्वल प्रवाह आता वाहू लागला आहे. या प्रवाहाची सुनामी येवो आणि त्यात देशातलं सर्व हीन वाहून जावो अशी आकांक्षा आपण बाळगू या.
मुख्य म्हणजे सावरकर साहित्यातील काही अवघड संस्कृतप्रचुर शब्द पुढे त्यांना सोपे प्रतिशब्द देऊन ती वाचते. ही भर गीताचे वडील श्री चारुचंद्र उपासनी यांनी टाकली आहे आणि त्यामुळे हे वाचन सर्वांना सहज आकळते आणि गीताच्या ओजस्वी वाणीमुळे थेट हृदयाला भिडते.
कित्येक अंध, कित्येक अल्पशिक्षित आणि कित्येक ग्रामीण भागातले लोक हे वाड़्मय ऐकतात जे त्यांना एरवी ऐकायला, वाचायला मिळालं नसतं. शाळांमध्ये देवळांमध्ये खेड्या पाड्यात हे वाड़्मय ऐकवलं गेलं तर देशाचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही.
या प्रकारे एक पिढी जर घडवता आली तर देशासाठी ती एक क्रांतिकारक घटना ठरेल.
गीताचे शिवचरित्राचे सर्व भाग आणि वेदस्तुतीचे कार्यक्रम आणि सावरकर साहित्य युट्यूबवर geeta upasani असं टाईप करताच पहायला ऐकायला मिळतील.
आणि सर्व ऑडिओ www.geetaupasani.com या संकेतस्थळावर मिळतील.

शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता , 
अध्यात्मवादी सावरकर , 
संभाजी महाराज,
प्रेरणादायी भारतीय अध्यात्म,
हिंदू धर्मातील स्त्रीचं स्थान, 
सावरकरांचा राष्ट्रवाद, 
सहा सोनेरी पाने, 
स्त्री शक्तीचा जागर. 
इत्यादी विषयांवर अत्यंत अस्खलित वाणीतून गीताची व्याख्यानं होतात.
कीर्तनकार प्रवचनकारांच्या नऊ पिढ्यांच्या वारसा गीताच्या अमोघ वक्तृत्वात आहे. तरुण पिढीत देशधर्माची प्रीती निर्माण करण्याचा तिनी वसाच घेतला आहे...

2 comments:

 1. Namaskar Geeta,
  Myself Sachin Dahake was student of your mother Veena madam for maths in my engineering (Swami vivekanand) days.
  I have seen Geeta's brightness when she was kid.
  Shatasha Dhanyavad.
  Aaplya kartutvala jod nahi.
  Uttishthat Jagrat Prapya Varanni Bodhat.

  Sachin Dahake. (Mulund)

  ReplyDelete