About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

गीतानुवाद, अध्याय पहिला

प्रद्युम्नवाटिका(शेरूबाग)

अध्याय पहिला (अर्जुनविषादयोग)

धृतराष्ट्र म्हणाला 

धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रि अन्
काय करिती योद्धे वीर।
पुत्र माझे आणि पण्डुचे
सांग संजया मी अधीर।।  १/१

संजय म्हणाला

रचित पाहुनी पाण्डवसेना
द्रोणाजवळी तो जाऊन।
काय बोलला दुर्योधन तो
संवाद राजा घे ऐकून।।  १/२

गुरुजि पहा ही मोठी सेना
द्रुपदपुत्राने  रचिली।
बुद्धिमान त्या तुमच्या शिष्ये
पाण्डवसेना ती सजली।।   १/३

पहा इथे हे धनुष्यधरी
अर्जुन आणिक भीम जसे।
द्रुपद आणिक युयुधानासह
महारथी विराट असे।।   १/४

श्रेष्ठ नर ते धृष्टकेतु
काशिराज अन् चेकितान।
पुरुजित् आणिक शैब्य सोबती
कुन्तिभोज ते शोभत छान।।  १/५

पराक्रमी हा युधामन्यु हो
उत्तमौजा वीर्यवान्।
महारथि तो अभिमन्यू हो
द्रौपदिपुत्र शक्तिमान।।    १/६

नायक तुम्ही मम सैन्याचे
कथितो तुम्हा आपुले बळ।
सवे घेउनी विशेष जे जे
योजा तुम्ही विशेष बळ।।   १/७

युद्धविजयी तुम्हासारखे
भीष्म कर्ण अन् कृपही सवे।
अश्वत्थामा सौमदत्ती
विकर्ण आणिक कोण हवे।।  १/८

आणिक कितितरी उदार होती 
माझ्यासाठी जिवांवर। 
युद्धनिपुण ते शस्त्र घालिती
विजयांसाठी शत्रूंवर।।     १/९
(माझ्यासाठी = दुर्योधन स्वतःला उद्देशून म्हणत आहे)

अफाट अपुले बळ असे हे
भीष्मांनी हे राखिले।
परंतु त्यांचे बळ मर्यादित
भीमाने ते राखिले।।    १/१०

आपआपुल्या नियुक्त स्थानी
रहा उभे तुम्ही निश्चये।
रक्षित व्हावे भीष्मपितामह
यत्न करा हा सकळ स्वये।।   १/११

लगेच वृद्ध पितामहांची
शंखगर्जना दणाणली।
सिंहनाद तो ऐकुनि त्याची
छाती हर्षे दुणावली।।     १/१२
(त्याची = दुर्योधनाची)

नंतर शंख ढोल नगारे
आणिक शिंगे ती किती।
एकाएकी वाजु लागली
नाद माजला किती किती।।   १/१३

तेवढ्यात शुभ्र अश्वयुक्त त्या
रथात मोठ्या बसलेले।
कृष्णार्जुन मग शंख दिव्य ते
स्वतः वाजवते झाले।।   १/१४

पाञ्चजन्य अन् देवदत्त अन्
पौण्ड्र नावाचे शंख।
कृष्णार्जुन अन् भीम फुंकिती
जणु आकाशी तो डंख।।    १/१५

युधिष्ठिराने वाजविला मग
अनंतविजय हा शंख।
नकुल आणि सहदेवांचे
सुघोष आणि मणिपुष्पक।।   १/१६

धनुष्यधारी काशिराज अन्
महारथी हे शिखण्डी।
विराट धृष्टद्युम्न सात्यकी
त्यांची कीर्ती त्रिखंडी।।     १/१७

ऐका राजन् द्रौपदिपुत्रे
आणिक त्या हो द्रुपदाने।
महाबाहु त्या सौभद्राने
शंख फुंकिले एकेकाने।।    १/१८

पृथ्वि कापली त्या घोषाने
छतही नभाचे फाटले।
कौरव हृदये चिरली गेली
भयही त्यातचि दाटले।।     १/१९

समोर बघता कौरवांना
बाण सोडण्याच्या वेळी।
ऐका राजन् अर्जुन म्हणतो
श्रीकृष्णाला त्यावेळी।।     १/२०

अर्जुन म्हणाला

अहो अच्युत रथ न्या माझा
दोन्ही सैन्यांच्या मध्ये।
कोणकोणते वीर पहातो
युद्धोत्सुक या रणामध्ये।।    १/२१
(अच्युत = श्रीकृष्ण )

वीर कोणते आले येथे
लढू इच्छितो त्यांच्याशी।
यमसदनाला जातिल ते ते
युद्ध करोनि माझ्याशी।।    १/२२

बघून घेतो त्यांना आता
फणफणले जे युद्धज्वरे।
लाड करण्या दुर्बुद्धाचे
आले धाउनि जे त्वरे।।      १/२३
(दुर्बुद्धाचे = दुर्बुद्धी झालेल्या दुर्योधनाचे)

संजय म्हणाला 

अशा प्रकारे संबोधित तो
अर्जुनद्वारे भगवंत।
सैन्यामध्ये नेई रथ तो
ऐक राजा भाग्यवंत।।    १/२४

भीष्म द्रोण आणिक राजे
महाराजांच्या समक्ष।
कृष्ण म्हणाला पार्था आता
पहा कौरवां प्रत्यक्ष।।    १/२५

काका मामा भाउबंद अन्
सखे सोयरे सोबती।
गुरू कृपाळू पाही अर्जुन
सैन्याच्या त्या मध्यवर्ती।।   १/२६

त्या सुहृदांना पाहुनि अर्जुन 
भावविव्हल जाहला।
शोकपूर्ण त्या हृदयावेगे
श्रीहरीशी बोलला।।     १/२७

अर्जुन म्हणाला 

पाहुनि माझे हे जे प्रियजन
युद्धोत्सुकही झालेले।
कंपित होई काया माझी
तोंडही माझे सुकलेले।।    १/२८

काटा सरसर अंगावरती
काया माझी चळचळते।
गळे धनुष्य हातातुनही
त्वचाही माझी जळजळते।।   १/२९

उभा न राहू शके इथे मी
डोके माझे गरगरते।
अशुभाच्या या संकेताने
हृदय केशवा धडधडते।।    १/३०

नको रे कृष्णा राज्य विजय अन्
नको मला ती सुखे अनेक।
मारुनि युद्धी या स्वजनांना
श्रेय न दिसते काही एक।।   १/३१

राज्यलक्ष्मी ज्यांच्यासाठी
सुखसंपत्ती मिळवावी।
विना त्यांच्या अस्तित्वाच्या
वृथा रे कृष्णा भासावी।।   १/३२

असे इथे रे युद्धि ठाकले
प्राणधनांना ठोकारून।
वडीलधारी आणि पितामह
आणि लेकरे सरसावून।।   १/३३

मामा आणिक वृद्ध सासरे
नातू शालक संबंधी।
ठार जाहलो तरी बरे ते
नको मारणे यांस कधी।।    १/३४

कौरवांना मारुनि कुठले
सुख ते मिळणार जनार्दना।
पृथ्वी नाही त्र्यैलोक्याशी
नाही होणार ती तुलना।।    १/३५

असतिल दुष्ट जरी हे कौरव
मारुनि यांना लागेल पाप।
स्वजनांना या ठार मारिता
ऐक माधवा होईल ताप।।   १/३६

म्हणुनि मारणे योग्य नसे रे
यांना, कौरवस्वजनांना।
स्वजन मारुनी सांग माधवा
भोगु कैसे मी सुखांना।।      १/३७

लोभाविष्ट ती मने जाहली
यांची दृष्टी आंधळली।
कुलक्षयाची मित्रवधाची
पापदशाही ना कळली।।   १/३८

आपल्याला तर कळतो ना रे
दोष तरी कुलनाशाचा।
जनार्दना मग का न धरावा
मार्ग आता हा परतीचा।।    १/३९

कुलक्षयाने नष्ट होतसे
शाश्वत ऐसा कुलधर्म।
धर्म नासता कुलहि नासते
आणि माजतो अधर्म।।    १/४०

आणि अधर्म होता प्रबळही
होती दूषित कुलस्त्रिया।
वर्णसंकर पतित स्त्रियांसह
कृष्णा अशक्य टाळण्या।।    १/४१

संकर नेतो नरकाला मग
कुलासह कुलबुडव्यांना।
श्राद्धविधींच्या पूर्ण अभावे
पितर पुरवितो नरकांना।।    १/४२

वर्णसंकर करणार्यांच्या 
अशा महान दोषाने।
जातिधर्म ते कुलधर्मासह
होतिल नष्ट पापाने।।      १/४३

ऐकतो ऐसे देवा आम्ही 
मिळे नरक त्यांना नित्य।
कुलधर्माचा नाश करिती
असे शाश्वत जो नित्य।।    १/४४

अरे अरे रे पाप केवढे
करण्या झालो उद्युक्त।
स्वजन मारण्या झालो तत्पर 
राज्यलोभे आसक्त।।     १/४५

जरी विना मी प्रतिकाराच्या
शस्त्ररहित होऊनि रणी।
कौरवद्वारे ठार जाहलो
ठरेन धन्य मनोमनी।।      १/४६

संजय म्हणाला

युद्धभूमिवरि असे बोलुनी
अर्जुन रथतळी बैसला।
धनुष्य टाकुनि बाणांसह तो
शोकमग्न अति जाहला।।    १/४७

'ॐ तत्सत्'म्हणु या आता
गीता उपनिषदातला।
अर्जुनविषादयोग म्हणुनी
अध्याय पहिला संपला।।

©चारुचंद्र उपासनी.

No comments:

Post a Comment