About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

सावरकरांची पणती

सावरकरांची पणती...

दि २६ जानेवारी, २०१८चा दिवस छानच समृद्ध अनुभव देऊन गेला. भोसरी,पुणे येथील जिजामाता विद्यालयातील ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून, संस्थेच्या अध्यक्षा सौ. आशाताई कुलकर्णी यांनी मला आमंत्रित केलं होतं.
सकाळी सात वाजता ध्वजवंदनासाठी सज्ज असलेली गणवेशधारी मुलं शिस्तीत बसली होती. मुख्याध्यापक गायकवाड सर आणि इतर शिक्षक यांनी मुलांकडून सुंदर देशभक्तीपर गाणी चांगली तालासुरात बसवून घेतलेली ऐकलीत.
शाळेच्या नावात असलेल्या जिजाऊ, मुलांच्या मनातही ठसाव्यात म्हणून मी जिजाऊ आणि शिवरायांवरही बोलले.
शेवटी आभारप्रदर्शन करतांना माझा उल्लेख सावरकरांची पणती असा केला गेला त्यावर मी सौ. कुलकर्णीबाईंना म्हणाले की वीर सावरकरांशी असलेलं माझं नातं निव्वळ  भावनिक आहे वांशिक नाही..!

पण 'सावरकरांची पणती' असा माझा काहीतरी घोटाळा होऊन का होईना जो परिचय करून दिला गेला, त्यावरून मी अगदी भावमग्न झाले.
माझ्या मनात विचार आला की  बालवयातच मनानं, बुद्धीनं प्रगल्भ झालेले आणि कृतीनं देशभक्त ठरलेले वीर सावरकर हे त्यावेळच्या हिंदुजातीच्या पिढीचे यथार्थ सुपुत्र होते.
प्रौढ वयात असतांना ते त्यांच्या पिढीतील हिंदूंचे निरतिशय हितैषी अन् नितांत हितकर्ते असे बंधूच होते आणि त्याच न्यायाने त्यांच्या पुढच्या पिढीचे पिता, नंतरच्या पिढीचे पितामह आणि कालक्रमानुसार आताच्या माझ्या पिढीचे प्रपितामह म्हणजे पणजोबा ठरतात..!
म्हणून केवळ मीच काय, माझी समवयस्क प्रत्येक हिंदुकन्या त्यांची पणतीच नव्हे काय?
या विचारानं मनाला आनंद झाला आणि आनंदातच मी थोड्याच वेळात कराडला जायला निघाले. त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता माझं कराडला वीर सावरकरांवर व्याख्यान होतं.

चारच्या सुमारास मी श्री आमोद व्यास यांच्या घरी पोहोचले. कार्यक्रमाचे आयोजक आणि तेथील नगरसेवक श्री सुहास जगताप आणि आणखी काही मंडळी मला भेटायला आलीत. तिथे मला श्रीयुत जगताप यांच्या सामाजिक कार्याची जी माहिती मिळाली तिनं मी अवाक् झाले. निवडून येण्यासाठी आणि येण्यापुरती समाजसेवा करणारे बरेच असतात पण समाजसेवा करता आहातच मग आमचे नगरसेवकच व्हा अशी लोकांनी गळ घालून त्यांना या पदावर बसवलं आहे, हे कळलं आणि अश्या व्यक्तीच्या भेटीचा आनंद झाला.
तिथल्या मंडळींनी मला एक शंका बोलून दाखवली. ते म्हणालेत "हा कार्यक्रम ज्या पटवर्धन सभागृहात आहे त्याची मर्यादा जरी दोनशे लोकांची असली तरी तिथे साधारण शंभर पर्यंतच श्रोते येतात असा आमचा अनुभव आहे. येणारी मंडळी मात्र चांगले जाणकार श्रोते आहेत आणि त्यांच्या समोर व्याख्यान  रंगतं. पण योगायोगानं झालय् काय की हा कार्यक्रम अगदी अलीकडे ठरला त्यामुळे प्रसिद्धी फार करता आली नाही त्यात आजच गावात दोन वेगळे कार्यक्रम आहेत म्हणून श्रोते विभागलेही जातील त्यात तीन दिवसाच्या सुट्यांमुळे काही लोक बाहेरही गेले आहेत ". श्रीयुत जगताप म्हणालेत , "ताई लोक कमी अधिक कितीही येऊ द्या , तुमची अनुमती असेल तर पूर्ण व्याख्यान आम्ही चित्रित करतो आणि कराड आणि पाटण तालुक्यात स्थानिक वाहिनीवरून सहस्रावधी लोकांपर्यंत पोहोचवतो." मी म्हणाले, "अवश्य"
तेवढ्यात कराड अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या तीन मुली मला भेटण्यासाठी म्हणून श्री व्यास यांच्या घरी आल्यात आणि म्हणाल्यात "आम्ही तुमचं भाषण  ऐकायला आलो आहोत पण भाषणानंतर तुम्हाला भेटायला मिळेल की नाही असं वाटलं आणि तुम्ही इथे आला आहात हे कळल्यामुळे आधीच भेट घ्यायला आलो." असं म्हणून त्या लगेच निघाल्यात. तोपर्यंत कळलं की मांडलेल्या खुर्च्या जवळ जवळ भरल्या आहेत. हे ऐकल्यावर तिथे पुनः शंभर खुर्च्या लगेच पाठवण्यात आल्यात आणि सभागृहात आम्ही पोहोचेपर्यंत त्या भरतही आल्यात. नंतर तर सभागृहाबाहेर खुर्च्या मांडण्यात आल्यात आणि एक स्पीकरही.

सभागृहाकडे निघतांना कराड मधील श्री गणेश काशीद यांनी मला अप्रतिम फेटा बांधून दिला..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, श्री सचिन जगताप यांनी कल्पकतेने तयार केलेल्या फ्रेम मध्ये, प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर यांनी काढलेलं महाराजांचं चित्र, मला भेट देण्यात आलं.
कराडचे डी एस् पी, पालिकेच्या महापौर, तेथील ज्येष्ठ नेते श्री पावसकर, श्री भैया जगताप इ. मान्यवर व्यासपीठावर होते.
श्रोत्यांनी सगळ्यांचाच चांगल्या अर्थानं अपेक्षाभंग केला आणि मी समरसून व्याख्यानाला सुरुवात केली.
वीर सावरकरांचं अध्यात्मवादित्व निरपवादपणे पटवून देण्यात मी यशस्वी होत होते हे मला श्रोत्यांच्या चर्येवरून समजत होतं. व्याख्यान संपलं आणि त्या मुली म्हणाल्यात तसा श्रोत्यांनी मला अक्षरशः गराडा घातला. एक महिला माझ्याजवळ आली आणि अगदी सगद्गद होत माझ्या खांद्यावर हात ठेवत मला म्हणाली , "सावरकरांचे विचार ठरवून अंधारात ठेवले गेले, तू मात्र त्या विचारांची पणती आहेस!, तुझ्या ज्योतीनं अशा लाख्खो पणत्या पेटाव्यात आणि देश उजळून जावा"

त्या महिलेनं माझ्यासाठी योजलेल्या 'पणती' या शब्दप्रयोगानं मी अंतर्बाह्य मोहरून गेले. सकाळीच मला पणती म्हटलं गेलं होतं!
पहिलं गोंधळून म्हटलं गेलेलं होतं तर दुसरं ओवाळून टाकणारं होतं..!
त्या महिलेनं सद्बुद्धीनं दिलेल्या पदवीनं मला अगदी धन्य वाटलं. ज्ञानेशांची पणतीच्या ज्योतीसारखीच एक चिमुकली अन् तेजस्वी ओवी मनात चमकली..
"जैसी दीपकलिका थेकुटी
बहु तेजाते प्रकटी
तैसी सद्बुद्धी धाकुटी
म्हणो नये.."
- गीता चारुचंद्र उपासनी.

No comments:

Post a Comment