About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

'क्रांतितीर्थ'

क्रांतितीर्थ...
दि. 18 एप्रिल हा क्रांतिवीर हुतात्मा चापेकर बंधू आणि हुतात्मा महादेव रानडे यांचा बलिदान दिन. त्या निमित्ताने क्रांतिवीर चापेकर स्मृतिसमितीच्या द्वारे माझं व्याख्यान चिंचवड येथील  हुतात्मा चापेकरांच्या वाड्याच्या आवारात ठेवलं होतं.
संध्याकाळी चिंचवडला येऊन पोहोचले. प्रथम श्री प्रद्योत पेंढारकरांकडे त्यांचा शिवकालीन शस्त्रसंग्रह पहायला गेले. ते या शस्त्रांचं प्रशिक्षण देऊन तरुणांमध्ये इतिहासाची, ऐतिहासिक शस्त्रांची आवड निर्माण करतात आणि त्याच बरोबर त्यांच्यात व्यायाम, सावध स्वसंरक्षण, प्रतिकार इत्यादी गुण विकसित व्हायला सहाय्य करतात.
त्यांच्या त्या संग्रहातली ती शस्त्रे पाहून ते शस्त्रधर डोळ्यापुढे सळसळू लागलेत. त्यांचे उपकार आठवून मन भरून आलं. त्यांच्याशी असलेली भावनेची जवळीक म्हणून मी डोक्यावर शिरस्त्राण घातलं, संभाजी महाराज वापरीत तशा प्रकारची सर्पिणी तलवार उचलून केवळ छायाचित्रापुरती का होईना खड्गपाणी झाले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे थेट हुतात्मा चापेकरांच्या आता जीर्णोद्धार केलेल्या वाड्यात आले. इथेच भारतमातेचे ते दिव्य सत्पुत्र जन्माला आले होते, रांगत बागडत जरासे वयात येताच या जीवनाचा अनावर मोह टाकून मातृभूमीची पूजा, आपली शिरकमलं वाहून त्यांनी केली होती. 1883 या वर्षी आद्य क्रांतिकारक वीरवर वासुदेव बळवंत फडक्यांना कारागृहात वीरमरण आल्याचं वृत्त पिताश्री हरिपंत चापेकरांनी इथेच वाचून दाखवलं होतं आणि त्या कोवळ्या बालकांच्या मनात देशभक्तीची तेजस्वी ठिणगी इथेच पडली होती.
या आणि अशा विचारांचा भावनावेग मला त्या वास्तूत बसले असता अनावर झाला आणि त्यांची उपेक्षा करणारे , त्यांच्याच हौतात्म्याचं फळ असलेल्या स्वातंत्र्यात सत्ता भोगत असतांना त्यांचं कृतज्ञ स्मरणही न करणारे नंतरचे सत्तांध, स्वार्थांध आणि जात्यंध राजकारणी आठवून संतापही अनावर झाला.
भावनांचे हे आवेग अन् उद्वेग काहीसे आवरीतच मंचावर आले. स्मारक समितीचे अध्यक्ष आणि मोठं सामाजिक कार्य उभं करणारे श्री गिरीशजी प्रभुणे, भारताचे सुवर्ण पुरुष पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि इतर मान्यवर मंचावर होते.
समोर पाचेकशे शाळकरी मुलं होती, या संस्कारक्षम वयोगटातील मुलांशी संवाद साधता आला. त्यांच्यातल्याच एका गटानं चापेकरांचा पोवाडा खड्या आवाजात म्हटला. उपस्थित असलेली सर्व बालकेच नव्हेत तर तीनेकशे प्रौढ श्रोतेही त्या पोवाड्यानं भारावून गेलेत.
त्या मंचासमोरच चापेकर वाड्याच्या मागच्या बाजूची विहीर दिसली. मला चापेकरांच्या चरित्रातला एक हृद्य प्रसंग आठवला. चापेकर रॅन्ड्ला गोळ्या घालून आलेत आणि याच विहिरीशी आंघोळीला बसलेत. इतक्यात त्यांची सहा वर्षांची कन्या समोर आली आणि दुष्टाला प्रायश्चित्त मिळाल्यावर सज्जनाला होणाऱ्या आनंदात म्हणाली,
 "बाबा बाबा त्या रॅन्ड्ला कुणीतरी गोळ्या घातल्यायत"
त्या विहीरकडे निर्देश करीत मी तो प्रसंग व्याख्यानात सांगितला. एकंदरीतच क्रांतिकारकांचा महान त्याग आणि त्यांचं योगदान या विषयीपण बोलले.
आपल्या व्याख्यानानं श्रोते भारावून जावेत असं प्रत्येक व्याख्यात्याला वाटतं, इथे व्याख्यानस्थळ थेट क्रांतितीर्थ असल्यामुळे मीच भारावून गेले होते.
हे स्मारक एक राष्ट्रीय पातळीवरून नावघेण्याजोगं व्हावं, सगळ्याच क्रांतिकारकांच्या चरित्राचा मागोवा घेण्याचं प्रमुख केंद्र व्हावं या दिशेने स्मारकसमितीची वाटचाल सुरू आहे आणि त्यासाठी सध्याचं शासनही अनुकूल आहे हे तिथे कळलं आणि मोठा आनंद वाटला.
-गीता चारुचंद्र उपासनी.


1 comment:

  1. प्रेरणादायी ठिकाण आहे
    आपले कार्य क्रांतिकारासारखं
    प्रेरणादायी आहे.
    शतशः प्रणाम
    वन्दे मातरम्

    ReplyDelete