About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

पंढरपूर व्याख्यान, ४ जून २०१६

दि. चार जून ला पंढरपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय सौ भक्तीताई कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त त्यांचे यजमान श्री अभयराव कुलकर्णी यांनी माझं
' हिंदुधर्मातच स्त्रीचा सन्मान '  या विषयावर व्याख्यान ठेवलं.
दि. तीन जून ला त्यांचे भाचे श्री केतन चंद्रचूड मला पुण्याहून पंढरपूरला न्यायला  सपत्निक आलेत. मी माझ्या आई वडिलांसह पंढरपूरला जायला निघाले. प्रवास अगदी सुखदपणे सुरू होता. पंढरपूर जवळ येऊ लागलं, मन उल्हसित अन् उत्सुक झालं. मी प्रथमच त्या संतांच्या माहेरनगरीत जात होते. ज्ञानेश्वर तुकाराम अन् तश्याच महान संतांना  आणि लाख्खो वारकर्यांना भक्तांना शेकडो वर्षांपासून ज्याच्या भेटीची अनावर ओढ असते त्या पंढरीरायाचं मी दर्शन घेणार होते. मन अगदी भावविभोर झालं. एका मनोमयी दिंडीत मी सम्मीलित झाले. मनानं भजनी ठेका घेतला. मालकंसच्या स्वरांच्या अनाहत नादात ' सावळी सुंदर रूप मनोहर. . '
' विठ्ठल नामाचा रे टाहो.... ' अशी भजनं मनात रुंजी घालू लागलीत. श्री अभयरावांकडे आम्ही येऊन पोहोचलो. जेवणं होऊन आम्ही पडलो पण रात्रीच्या त्या नीरव शांततेत मला नामदेवाच्या जनाबाईच्या चोखामेळ्याच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्त पुंडलीकाच्या गावी आल्याची जाणीव होत होती. सकाळीच अकरा वाजता माझं व्याख्यान होतं म्हणून अगदी लवकर दर्शनाला निघालो. तिथले मान्यवर पत्रकार श्री महेशराव खिस्ते आम्हाला अतिमहत्त्वाच्या दर्शिकांवर (vip pass) लगेचच मंदिराच्या गाभार्याशीच घेऊन गेलेत. पांडुरंगाच्या चरणस्पर्शानं मी मोहरून गेले. त्या चरणस्पर्शानं मला एका महान मंडळाचं सदस्यत्व मिळालं. माझ्या प्रमाणेच इथे माथा टेकलेले जीवित लाख्खो भक्त , शेकडो वर्षांत इथे येऊन गेलेले करोडो दिवंगत भक्त , अशा विशाल मंडळात मी आता सामावले होते. गाभार्यातून आम्ही बाहेर आलो. त्या भारावलेल्या मनस्थितीत दादा, माझे वडील बोलू लागलेत. " हा गरूडखांब अन् हे बाकीचे सुंदर खांब बघितलेत. इथेच आला होता तो अफझुल्ल्या.   हे मंदिर तोडू नका म्हणून लोक विनवत होते. तो त्यांना मारत होता तुडवत होता. त्याचा हुक्म म्हणून घरा घरातल्या गाई खेचून आणण्यात आल्यात आणि इथेच या आवारात चराचरा कापण्यात आल्यात. इथल्या या खांबा खांबावर त्यांचं रक्त फेकलं जात होतं , काफरांचं हे मंदिर पाक व्हावं म्हणून ! त्याला महाराजांना मारायची घाई होती आणि ते शतकृत्य करून आल्यावर या मंदिराची मशीद करायची, ही खूणगाठ बांधून तो निघाला आणि महाराजांनी त्याचा कोथळा काढला म्हणून हे मंदिर आणि देश बराचसा वाचला. अशी आपत्ती या देशावर येऊ नये या साठी प्रत्येकाच्या हृदयात शिवज्योत पेटवण्याचं काम तू करायचय् "
दादा बोलत होते अन् डबडबलेल्या डोळ्यांनी अन् भारावलेल्या अंतःकरणानं मी ऐकत होते.
मंदिरातून मी सभास्थानी गेले. स्वर्गीय सौ भक्तीताईंचा हा स्मृतिदिन त्यांच्या कुटुंबीयांपुरता मर्यादित नव्हता असं माझ्या लक्षात आलं. त्यांच्या लोकसंग्रहामुळे गावातले अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. प्रथम त्यांच्या विषयी काही जण दोन शब्द बोललेत. त्यांच्या कन्येचं बोलणं अगदी हृदयाला भिडणारं होतं. व्यासपीठावर उभी राहिले आणि त्या हृद्य समारंभानं मलाही गलबलून आलं. दोन वर्षांपूर्वी दादांनी शंकराचार्यांच्या प्रसिद्ध पांडुरंगाष्टकाचं मराठी समवृत्त समश्लोकीकरण केलं होतं. ही रचना प्रथम पंढरपूरला म्हणावी आणि मग ती फेसबूक आणि अन्य माध्यमातून प्रसृत करावी अशी त्यांची इच्छा होती. व्यासपीठावर प्रथम हे पांडुरंगाष्टक त्याच्या मराठी रूपांतरासह मी म्हटलं आणि दादांची ही रचना भक्तीताईंच्या स्मृतीला अर्पण केली. हिंदुधर्मातच स्त्रीला कसं सन्मानित होता येतं हे मी वैदिक पौराणिक अन् ऐतिहासिक संदर्भ देऊन माझ्या भाषणात सिद्ध केलं. पंढरपुरातल्या विद्वान मंडळींनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं अन् मला खूप धन्यता वाटली.
संध्याकाळी पंढरपुरातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन आम्ही चंद्रभागेच्या विस्तीर्ण तीरावर आलो. तीरावरचं ते विशाल वाळवंट पाहून मी आनंदले. शेकडो वर्षापासून लाख्खो वारकरी इथे आषाढी कार्तिकीला उराउरी भेटतात.
' विष्णुमय जग आम्हा वैष्णवांचा धर्म,  भेदाभेद भ्रम अमंगळ '
ही त्यांची धारणा असते. मनात आलं, समता, बंधुता, ऐक्य चारित्र्य, दया, पावित्र्य, आचारशुद्धी, आहारशुद्धी अशा एकाहून एक थोर गुणांचं रोपण समाजावर या पंढरपूर मार्गातून होऊ शकतं. केवढ्या मोठ्या सामाजिक आध्यात्मिक परिवर्तानाचा शुद्धीकरणाचा स्रोत आहे हे पंढरपूर!
राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्यासाठी किती उपकारक आहे हे स्थान आणि त्याचं महत्त्व!
 त्या पवित्र तीरावरून मला त्या नगरीचा जेवढा विस्तार दिसत होता त्यापेक्षा कितितरी अधिक ते संतवाड़्मयात अन् लोकवाड़्मयात विस्तारलं होतं. ती चंद्रभागा माझ्या समोर जेवढी संथ वहात होती त्यापेक्षा कितितरी अधिक ती संतवाड़्मयात अन् लोकवाड़्मयात वहात होती.
" जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर
जेंव्हा नव्हत्या यमुना गंगा तेंव्हा होती चंद्रभागा "
अशा सुंदर भावपूर्ण काव्यातून हे पंढरपूर अन् ही चंद्रभागा लोकमनात स्थिरावली आहे.
- गीता चारुचंद्र उपासनी.


No comments:

Post a Comment