About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

आमडोशी, २६ मार्च २०१६

फाल्गुन वद्य तृतीया, दि 26 मार्च. शिवजयंतीच्या सुमुहूर्तावर मी रायगड जिल्ह्यातल्या माणगावजवळील आमडोशी या इवल्याशा गावात येऊन पोहोचले.
गावाची लोकसंख्या छोटी, घरं छोटी पण जे महानगरांमध्ये हरवलेलच असतं ते आकाश मोठं होतं. माणसांची मनं मोठी होती. आवार मोठं होतं. एक एक छोटेपणा
दुस-या मोठेपणानं भरून निघत होता. पाणी अडवल्यामुळे मार्चच्या अंतालाही नदी गावालाच काय गुराढोरांनाही पाणी देत होती.

एवढ्याशा गावात शिवजयंतीच्या उत्सवाचा उत्साह भरून वहात होता. संध्याकाळी मुलामुलींनी उत्तम नृत्ये सादर केलीत. श्री राजेश घुलघुले यांच्याकडे माझी व्यवस्था होती ती त्यांनी अगदी उत्तम आणि मनापासून ठेवली.
रात्री शिवचरित्रावर माझं जवळ जवळ दीड तास व्याख्यान झालं. आजूबाजूच्या पाच सहा छोट्या गावांमधून लोक आले होते. लोकांनी अतिशय शांतपणे मन लावून माझं व्याख्यान ऐकलं.

माझ्या लक्षात आलं की आजही लोकमानसात असलेली महाराजांविषयीची भक्ती एका मोठ्या शक्तीत रूपांतरित करता येऊ शकते. राष्ट्रीय चारित्र्याची सळसळती वीज निर्मिण्यासाठी शिवचरित्र हे एक अपूर्व जनित्र ठरू शकतं याचा मला प्रत्यय आला. दुस-या दिवशी घुलघुले परिवाराचा प्रेमळ निरोप घेऊन निघाले

आज तिथली आठवण पुनः जागी झाली. तिथून जवळच असलेल्या निजामपुर गावातून काही जण भाषणाला आले होते. त्यातील श्री कदम यांचा संदेश आला " तुमच्या व्याख्यानानं प्रभावित होऊन आम्ही  येथील तरूण मोठ्या संखेनं या गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर शिवचरित्राचा अभ्यास आणि तुमच्या आवाजातील शिव चरित्राचे पारायण श्रवण सुरू करीत आहोत. "
गावातलं व्यासपीठ उघड्या आवारात होतं. श्रोते तर उघड्या आकाशाखाली भणाणत्या वा-यात भाषण ऐकत होते पण मला आज समाधान वाटलं , माझं भाषण वा-यावर उडून वा-याबरोबर विरलं नव्हतं, लोकांच्या कानात शिरून मनात मुरलं होतं....
- गीता चारुचंद्र उपासनी.

No comments:

Post a Comment