About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

रत्नागिरी व्याख्यान, २६ फेब्रुवारी २०१७

दि 26 फेब्रुवारीच्या पहाटे मी आणि दादा, माझे वडील, रत्नागिरीच्या ' मराठा रेसिडन्सी ' या अत्यंत सुंदर हाॅटेलमध्ये येऊन पोहोचलो.
चौथ्या मजल्यावरच्या कक्षात काचेच्या दालनातून मी रत्नागिरी नगरी न्याहाळत होते. बारा वर्षांच्या वीर सावरकरांच्या तेथील वास्तव्यात ते याच परिसरातून कितीतरी वेळा आले गेले असतील, असा विचार मनात आला, थोड्याच वेळात सुरुचिर असा अल्पोपहार आला आणि त्याचा आस्वाद घेतांना मनात आलं, 'अरे आपण ज्या वीर सावरकरांवर बोलायला, त्यांच्या आत्मार्पण दिनी इथे भरणार्या अभिवादन यात्रेत सहभागी व्हायला आलो आहोत, ते अंदमानमध्ये काय कष्ट उपसत होते? राॅकेलचा भपकारा येणारा जाड्या भरड्या तांदळाचा भात, त्यात कुठल्याशा रान भाज्या मिसळलेल्या आणि त्या मुळीच न निवडलेल्या भाज्यांमध्ये कित्येक जळवा शिजलेल्या, पहिला घास घ्यायच्या आधी त्या पहाताच उलटी होईल अशा जळवा निवडून थाळीबाहेर काढायच्यात आणि मग ते कदन्न खायचं !' हा विचार मनात आला आणि मला अपराधी वाटू लागलं.

हे स्वातंत्र्य हे ज्यांचं ऋणं आहे त्यांचे उपकार फेडणं तर दूरच पण माझा देश त्यांची केवढी अवहेलना करीत आला, याची अनावर खंत वाटू लागली...

थोड्याच वेळात या अभिवादन यात्रेचे आयोजक श्री ठाकूरदेसाई आणि श्री सावंत आम्हाला घ्यायला आलेत. मारुती मंदिर सर्कल वरून ही यात्रा सुरू झाली. प्रथम महाराजांच्या भव्य पुतळ्याला दादांनी हार घातला आणि अनेक मोटरबाईक्स् आणि काही गाड्यांमधून वीर सावरकरांच्या जयजयकारात ही यात्रा निघाली. आमच्या समवेत होते वीर सावरकरांच्या या बारा वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्या सहवासात असलेले आणि आता एकशेएक वर्षांचे श्री वांदरकर गुरुजी..!

 वीर सावरकरांच्या पुतळ्याला हार घालतांना शिडीवर ते इतके पटपट चढलेत की ते पाहून मी अचंबित झाले. मार्गात लोकमान्यांचा जन्म जिथे झाला त्या वाड्यात जाऊन त्यांना आम्ही वंदन केलं. मग यात्रा येऊन पोहोचली ती रत्नागिरी कारागृहापाशी. अंदमान नंतर याच कारागृहात वीर सावरकर मुक्ततेपूर्वी काही दिवस बंदी होते.
त्यांना जिथे ठेवण्यात आलं होतं ती कोठडी, स्मारकात रूपांतरित केलेली आहे. तिथे जाण्यापूर्वी भ्रमणध्वनी अधिकार्यांच्या स्वाधीन केलेत. दार उघडलं गेलं आणि आत शिरल्यावर कुलुप लागलं. लुटुपुटुच्या त्या कारावासानेही क्षणभर धडकी भरली, तरी बरं, पायात खोडा, हातात बेड्या, गळ्यात सुटकेचा पन्नास वर्षानंतरचा दिनांक आणि अंगावर बंदीवेष असं काही नव्हतं, काही मिनिटातच सुटका होणार होती!!. आणि ती कोठडी जेंव्हा प्रत्यक्ष बघितली तेंव्हा मात्र अंगावर काटा आला, तात्यारावांना घातलेल्या बेड्या तो पायातला लोखंडी खोडा,  तो साखळदंड प्रत्यक्ष पाहिलं आणि डोळे डबडबून आले. कोठडी कसली ती एखाद्या स्नानगृहाएवढाच तिचा आकार! मी त्या बेड्यांना स्पर्श केला, माथा टेकला. त्या भेटीतून मनात आलेल्या भावना, दादांनी कारागृहातल्या वहीत नोंदवल्यात आणि आम्ही वीर सावरकरांनी दानशूर भागोजी कीर यांच्या करवी बांधलेल्या प्रसिद्ध पतितपावन मंदिरात येऊन पोहोचलोत.

 मी अनेक मंदिरांमध्ये गेले आहे पण या मंदिरातल्या भगवान विष्णूच्या चरणावर मस्तक ठेवतांना मला एक अपूर्व आनंद झाला. भगवंताचं पतितपावन हे विशेषण दुष्ट रूढींनी झाकाळलेलं होतं , वीर सावरकरांनी, त्यावेळच्या अस्पृश्यांना कवेत घेणारं हे मंदिर बांधून ते विशेषण सार्थ केलं.
मंदिर पूर्ण भरून बाहेरही अनेक श्रोते जमले होते. प्रथम दादांनी 26 फेब्रुवारी 1966,  सावरकर आत्मार्पणदिनाची त्यांची लहानपणीची एक हृद्य आठवण सांगितली आणि नंतर माझं भाषण झालं. वीर सावरकर आणि त्यांच्या दोन तीन गीतांवर मी साधारण तासभर बोलले. नंतर त्यांची काही गीतं गायली जाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

नंतर आम्ही गेलो ते रत्नागिरी जवळ असलेल्या शिरगाव नावाच्या रम्य गावी. तेथील श्री दामले यांच्या घरी वर्षभर वीर सावरकरांचं वास्तव्य होतं. त्यांना लिखाणासाठी एक खोली देण्यात आली होती. याच ठिकाणी त्यांनी ती सत्य घटनेवर आधारित असलेली , मोपल्यांचे बंड ही दिव्य कादंबरी लिहिली. तिथे वीर सावरकरांच्या काही वस्तू त्यांचं हस्ताक्षर पहायला मिळालं. दामले कुटुंबीयांनी आमचं छान स्वागत केलं. सुंदर योगायोग असा की
' मोपल्यांचे बंड ' मी वाचायला घेतलं आणि ते पूर्ण व्हायच्या आत ते जिथे लिहिलं गेलं त्या स्थळाचं पवित्र दर्शन मला झालं. या कादंबरीचे माझे लाख्खो श्रोते आहेत, त्यांची प्रतिनिधी म्हणून मी त्या स्थळाला आणि वीर सावरकरांना वंदन केलं.
पुढे रत्नागिरीचा भव्य रत्नेश्वर दुर्ग, नंतर अत्यंत निसर्गसुंदर समुद्रसान्निध्यातलं रत्नासारखं मिर्या हे गाव पाहिलं.. तेथील श्री सावंत कुटुबीयांच्या प्रेमळ आतिथ्याचा आस्वाद घेऊन परत रत्नागिरीला श्री ठाकूरदेसाई यांच्या घरी आले आणि माझ्या रत्नागिरी भेटीचं सार्थक झाल्याचा अनुभव आला. माझा आवाज ऐकला आणि श्री ठाकूरदेसाईंची चार वर्षाची कन्या एकदम म्हणाली 'मोपल्यांचे बंड भाग सोळाव्वा!' . मी एकाएकी हरखून गेले. वीर सावरकर जर आपण या उमलत्या वयात पुढच्या पिढीत बिंबवू शकलोत तर देशाचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल होईल.
रसातळातून खेचून काढून ही पिढी देशाला जगावर राज्य करण्याच्या योग्यतेचा बनवील.
या साठी आपण एकच करायचं, मी पाठवीत असलेलं साहित्य नुसतं स्वतःपुरतं न ठेवता या उमलत्या पिढीला ऐकवायचं..
-गीता चारुचंद्र उपासनी.

No comments:

Post a Comment