प्रद्युम्नवाटिका (शेरूबाग)
अध्याय दुसरा (सांख्ययोग)
संजय म्हणाला
त्या तशा त्या करुणापूर्ण
व्याकुळ ओल्या डोळ्यांच्या
अर्जुनाशी बोले माधव
करी गोष्टि तो मोलाच्या २/१
श्रीभगवान म्हणाले
कुठे आठवली तुला अवदसा
अशा संकट समयाला
असभ्यवर्तन मलिनकीर्तिचे
नेणार नाही स्वर्गाला २/२
अशी षंढता तुला न शोभे
वीरवर तू असे रणी
क्षीणदशा ही हृदयाची रे
टाक रहा तू उभा क्षणी २/३
अर्जुन म्हणाला
लढू कसा मी द्रोणांशी अन्
भीष्मांशी या बाणांनी
पूजावे मी नित्य जयांना
सुगंधि कोमल पुष्पांनी २/४
लोभी असतील गुरु जरी हे
मारणे त्यांना कसे बरे
भोग भोगणे रक्तयुक्त ते
भीक मागणे अधिक बरे २/५
नाही जाणत श्रेष्ठ काय ते
जिंकणे अथवा जिंकले जाणे
एक जाणतो , मारुनि यांना
नको मला ते असले जगणे २/६
दुर्बलतेने ग्रस्त असा मी
काय करावे मुळि न कळे
खरे काय ते तू उपदेशी
शिष्य तुझा मी कधि न ढळे २/७
साधन नाही कुठले दिसते
ताप मनाचा दूर करी
त्र्यैलोक्याचे राज्य मिळे जरि
नाही जाणार ताप तरी २/८
संजय म्हणाला
परमप्रतापी अर्जुन ऐसे
बोलु लागला कृष्णाशी
' लढणार नाही ' म्हणून ऐसे
बसला गप्प त्या सरशी २/९
शोकमग्न तो पाहुनि अर्जुन
सैन्यामध्ये बसलेला
कृष्ण हसोनी हळुचं तयाशी
ऐसे बोलू लागला २/१०
श्रीभगवान म्हणाले
शोक करणे अयोग्य ज्यांचा
शोक त्यांचा तू करतो
जीवित अथवा मृतांचा रे
शोकही पंडित ना करतो २/११
असे कधी रे झाले नाही
मी वा तू वा सगळे हे
नव्हते आधी नसतिल नंतर
प्रत्येक काळी आहेत हे २/१२
बाल्य यौवन वार्धक्यातही
देही आत्मा तो वसतो
जातांनाही अन्य देहि तो
धीर पंडित रे धरतो २/१३
थंडी अथवा जसा उन्हाळा
येतो जातो नियमाने
सुखदुःखाची चाले गती ती
सोसावी ती धीराने २/१४
सुखदुःखाला समभावाने
पुरुषश्रेष्ठा जो बघतो
अमृततत्वी जाई निश्चये
दुःखातुनि तो निवर्ततो २/१५
नसणाऱ्या रे गोष्टीचे ते
असणे कधि का संभवते
असणाऱ्याचे नसणे तैसे
ज्ञानिजनांना ना दिसते २/१६
भरून उरला पूर्ण शरीरी
आत्मा केवळ अविनाशी
समर्थ याला कोण मारण्या
विचार कर रे मनाशी २/१७
देहाचा हा अंत बोलिला
आहे निश्चित रूपाने
आत्म्याचा ना अंत कदापि
म्हणुनि लढावे यत्नाने २/१८
म्हणतात जे हे, मरतो हा वा
मारतो अन्य कुणास हा
अज्ञानी ते दोघे असती
मरण मारण्या अक्षम हा २/१९
जन्म न याला, मृत्यू कधि ना
पुनर्जन्मही यास नसे
नाही मारित शाश्वत हा जो
मारला कधिही जात नसे २/२०
पार्था जो रे याला जाणतो
शाश्वत अजन्म नित्य असा
मारेल तो रे मारविल अथवा
नाही संभव कधिही असा २/२१
वस्त्रे जुनि ती टाकुनि जैसी
नवीनं धारणं करतात
देह टाकुनी व्यर्थ जुना वा
धारणं नवीनं करतात २/२२
याला जाळू शके न अग्नी
पाणी भिजवू शके ना
शस्त्र छेदू शके न याला
वारा सुकवू शकेना २/२३
खंड न याचा होत कधीही
दाह कधीही होत नसे
सुकणे भिजणे कसले याला
सकलांमध्ये नित्य वसे २/२४
अविनाशी हा अदृश्य आत्मा
कल्पनेतही बसत नसे
जाणुनि यासी आता तू रे
शोक करणे उचित नसे २/२५
जरी तुला हे वाटे शूरा
जन्मुनि नित्य हा मरतो
तरीही यास्तव तुजला वीरा
शोक न ऐसा शोभतो २/२६
जन्म होता मृत्यू जैसा
मृतास जन्म निश्चित रे
म्हणुनि अटळ गोष्टीचा या
शोक करणे निष्फळ रे २/२७
आरंभाच्या पूर्वी होती
सृष्टी पूर्ण अव्यक्त
राही नंतर तशीच ती ही
मध्ये शोक रे अयुक्त २/२८
आश्चर्याचा कारक आत्मा
कोणी याला पाही वदती
ऐकुनि घेती विषयी याच्या
परंतु याला कधि न जाणती २/२९
सर्वांच्या देहात अवस्थित
आत्मा नित्य अवध्य
म्हणुनि कोणाविषयी कधिही
शोक न करणे अवश्य २/३०
क्षात्रधर्म हा तुला सांगतो
योग्य अशा युद्धाविना
नाही श्रेयस्कर ते दुसरे
कर्तव्य तुला युद्धाविना २/३१
असे लाभले सहजतेने
युद्ध आज हे घोर तुला
जणु स्वर्गाचे दार उघडले
मान क्षत्रिया थोर तुला २/३२
आणि जर का युद्ध टाळले
न्याय्य आणिक योग्य असे
कर्तव्याला चुकशिल तैसा
होईलं पापासहही हसे २/३३
दुष्कीर्ती रे तुझी अर्जुना
करतील हे तू जाण रे
अपकीर्तीहुनि नाही दुःखद
सभ्या जाणे प्राण रे २/३४
युद्ध टाळितो भ्याडपणाने
ऐसे वदतिलं महारथी
एरवी जे ते तुला मानिती
महारथींचा महारथी २/३५
नको नको ते म्हणतिलं शत्रू
वेळि अवेळी तुजसि असे
उणे लेखिता सामर्थ्याला
दुःखद याहुनि काय असे २/३६
ऊठ आता रे कुन्तीपुत्रा
हो युद्धासी तू सिद्ध
जिंकुनि करि तू राज्य इथे वा
जाण्या स्वर्गा हो सिद्ध २/३७
सुख दुःखे वा लाभ हानि ती
विजय अथवा पराभव
समान मानुनि झुंज आता तू
पापही लागणे असंभव २/३८
विवेचनातुनि तुज मी पार्था
आहे कथिले तत्त्व महान
ऐक बुद्धिच्या योगे कैसा
कर्मपाश तो तुटतो छान २/३९
धर्ममार्ग हा विघ्नरहित रे
सत्कर्माचा नाश नसे
याच्या थोड्या आचरणाने
संकट मोठे टळत असे २/४०
निश्चयी ते आक्रमितात
केवळ मार्ग सत्याचा
चळता बुद्धी आडवाटांनी
योग चालत राहण्याचा २/४१
स्वार्थभरित ती कितीक कर्मे
मधुरबोले जी कथिली
अर्ध्यामुर्ध्या ज्ञानाची ती
लोकां किति रे आवडली २/४२
भोग आणिक स्वर्ग अनेक
देतात जी जी लोकांना
आवडती ती अनेक कर्मे
जन्ममरण फेरा त्यांना २/४३
भोग आणिक सुखांमध्ये
अखंड जे जे लडबडले
अस्थिर बुद्धी असलेले हे
शाश्वत सुखास अंतरले २/४४
आत्ममग्नी शांती खरि ती
सत्त्वशील रे अर्जुन हो
त्रिगुणांच्या त्या वेदवचनां-
-च्याही अगदी पार हो २/४५
क्षितिजव्यापी असता जळ ते
विहिरीचे जे मूल्य असे
वेदांचे ते ज्ञान्यांसाठी
एवढेच काय ते मोल असे २/४६
कर्मावर रे फळावर ना
कधि असावे नियंत्रण
विफल आहे फल आशा ती
हो कर्तव्य परायण २/४७
अशा भोगामध्ये हो स्थिर
टाकुनि सगळी आसक्ती
समान पहाणे जयपराजय
हाच योग अन् ही भक्ती २/४८
हीन कर्म तू दूरही टाकी
बुद्धीने रे धनंजया
अनुदारांचा फलहेतू तो
बुद्धिशरण हो मिळव जया २/४९
अश्या विवेके दूर सार तू
बरी नि वाईट ती फले
योगाला त्या अंगिकार तू
कर्मकुशलता ज्यात फुले २/५०
बऱ्या वाईट कर्मांच्या रे
जन्म फळाने लाभतो
त्यागुनि आशा फळाची मग
ज्ञानी मुक्ती मिळवितो २/५१
विवेकाने जेंव्हा तू रे
करशिलं मोहारण्य पार
ऐकलेले अन् ऐकायचे ते
नसेल काही उरले फार २/५२
वेदकथित त्या कर्मफलांच्या
पार जावी बुद्धि तुझी
आत्ममग्न त्या समाधिमध्ये
अचल रहावी स्थिती तुझी २/५३
अर्जुन म्हणाला
स्थिरबुद्धीच्या व्यक्तीचे ते
काय रे लक्षण केशवा
चालतो बोलतो कसा तो रे
सांग मला ते माधवा २/५४
श्रीभगवान म्हणालेत
सर्व इच्छा टाकतो जेंव्हा
इंद्रियांच्या तृप्तीच्या
मग्न आत्मसमाधीतही
गोष्टी त्या स्थिरबुद्धीच्या २/५५
दुःखाने जो नाही त्रासत
ज्यासि सुखाची ओढ नसे
क्रोध भीती आसक्तीच्या
पार मुनी तो स्थिरहि असे २/५६
जिथे तिथे तो अनासक्तही
प्राप्त शुभाशुभ होतांना
आनंदी अन् द्वेषि न होई
बुद्धी सुस्थिर होतांना २/५७
जसे कासव अंग आवरी
स्वतःच्याच कवचात
स्थिरबुद्धीचा ओढी इंद्रिये
राही न विषयकचाट्यात २/५८
गोडी याला लागे जेंव्हा
या सर्वोच्च तत्त्वाची
रुची निघून जाते तेंव्हा
मनापासुनी विषयांची २/५९
ज्ञानी व्यक्तीलाहि अर्जुना
प्रबळ इंद्रियांचेच भय
बळे बळे ती मना ओढिती
कठिण त्यापासूनि अभय २/६०
संयम करुनी वरती इंद्रिया
श्रेष्ठ तत्त्वी राहतो जो
होते स्थिर ती बुद्धी त्याची
इंद्रियांचा स्वामी तो २/६१
विषयांच्या त्या चिंतनातुनी
होते निर्माण त्यांची ओढ
ओढीतुनि ती येई वासना
वासनेतुनी जन्मे क्रोध २/६२
क्रोधातुनि मग मोह जन्मतो
स्मृति जाते मोहामुळे
गोंधळ सगळा नासवि बुद्धी
नाशाचे मग गणित जुळे २/६३
द्वेष प्रीतिच्या वाचुनि ज्याची
आचरताती इंद्रिये
परमसुखाची प्राप्ती त्याला
बोलिलि आहे निश्चये २/६४
परमसुखाच्या ह्या प्राप्तीने
नाश अवघ्या दुःखाचा
प्रसन्न सुंदर स्थितीत ऐशा
लाभ बुद्धिस्थिरतेचा २/६५
तल्लीनता रे नाही ज्याला
बुद्धी त्याची डळमळते
अस्थिर अश्या स्थितीमध्ये
सुखशांतीही कोसळते २/६६
इंद्रियांच्या चिंतनी ती
हटकुनी बुद्धी भरकटते
वादळात रे नाव जशी ती
भलता मार्ग आक्रमिते २/६७
म्हणून शूरा इंद्रियांना
विषयांपासुनि ठेवी दूर
होतो तोचि स्थिरबुद्धीचा
तरतो विषयनदीचा पूर २/६८
बुद्धिपातळित निद्रित प्राणी
संयमी तेथे जागा असतो
इंद्रियांतही जागृत प्राणी
तिथे हा निद्रा सेवित असतो २/६९
लक्ष नद्यांनी भरतो सागर
तरीहि राही शांत जसा
इच्छांच्याही लक्ष प्रवाही
मुनिवर राही शांत तसा २/७०
टाकुनि इच्छा अवघ्या साऱ्या
अहंकारा सोडी तो
निस्वार्थी तो इंद्रियस्वामी
गोड शांती अनुभवतो २/७१
उच्च स्थितिला अशा जाता
ढळत नाही तिथूनि पार्था
मरणोत्तर ती स्थिती ईश्वरी
टाळी थेट महा अनर्था २/७२
ॐ तत्सत् म्हणू या आता
गीता उपनिषदातला
सांख्ययोग नाव ज्याचे
अध्याय दुसरा संपला
- ©चारुचंद्र उपासनी
No comments:
Post a Comment