About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..


देव्यापराधक्षमापनस्तोत्रम्

देव्यापराधक्षमापनस्तोत्रम्
न मन्त्रं नो यन्त्रं , तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं , तदपि च न जाने स्तुतिकथा: |
न जाने मुद्रास्ते , तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस् , त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
अर्थ :-
हे माते हे देवी मला मंत्र अन् पूजेतली यंत्र ठाऊक नाहीत . तुला आवाहन अन् तुझं ध्यान, पूजेतल्या विविध क्रिया, तुझ्या स्तुतिकथा हे मला काही येत नाही. मला माहित आहे ते केवळ दुःखहरण करणारं तुझं अनुसरण, तुझ्या मागोमाग येणं.
मराठी रूपांतर
न जाणे मंत्रन् ,यंत्रहि नच जाणे स्तुति तुझी
न जाणे आह्वानन् , नहि नहि ध्यानन् न स्तव तुझे
न जाणे मुद्रा वा , विलपन आणिक त्या क्रिया
तरी जाणे माते , अनुसरण ते क्लेशहरी जे ||1||
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तवचरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||2||

-अर्थः
माझ्याकडे पूजनाच्या विधींबद्दलचं ज्ञान नाही, पूजा करावी म्हटलं
तर पुरेसं द्रव्य(पैसा) नाही, आणि तोही असला तरी मूलतः असलेला आळस या अशा
गोष्टींमुळे मी तुझ्या चरणांपासून दूर झालो. पण हे सकलोद्धारिणि, शिवे,
माते, माझे हे अपराध पोटात घाल. कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण
माता कधीही कुमाता नसते.
मराठी रूपांतर
विधीच्या अज्ञाने, द्रव्योत्साह नसण्याने ग असा
तुझ्या पायांना गे, अंतरत असतो गे मी तसा
असे हे मोठे जे, घालि आई अपराध पोटि गे
कुपुत्राचे होणे, शक्य परि कुमाता न शक्य गे ||2||

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||3||
अर्थः -
या भूतलावर तुझे अनेक सरलमार्गी पुत्र असती पण त्यांच्या
मध्ये मीच असा तरल स्वभावाचा असा तुझा पुत्र आहे. माझा असा त्याग करणं
तुला शोभत नाही, कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीच कुमाता नसते
मराठी रूपांतर
तुझे येथे पुत्र , असति किती ते आई सुजन
परी त्यांच्या मध्ये , मीचि असे तरिही हा कुजन
तरीही माझा ग, त्याग तुजला शोभत न गे
कुपुत्राचे होणे, शक्य परि कुमाता न शक्य गे ||3||
जगन्मातर्मातस्तवचरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||4||
अर्थः -
हे जगन्माउली, मी तुझ्या चरणांची सेवा कधी केली नाही किंवा मी
तुझ्यासाठी म्हणून कधी द्रव्य वेचलं नाही. तरिसुद्धा तू तुझं निरुपम
प्रेम माझ्यावर ठेवलंस. म्हणतात ना, एक वेळ कुपुत्र जन्माला येऊ शकेल, पण
माता कधीच कुमाता नसते.
मराठी रूपांतर
जगन्माते कधिही, चरणसेवा नसलि घडली
नसेही दिधले, द्रव्य न कधिही प्रीति जडली
तरीही तू माते, प्रीति अनुपम ती करिशि गे
कुपुत्राचे होणे, शक्य परि कुमाता न शक्य गे ||4||
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||5||
मराठी रूपांतर
त्यजुनी देवांना, आणिक तसेचि पूजनविधी
वयही झाले ते, थेट पंच्यांशीच्याहि ग वरती
आता नाही जर, मिळे वरदान आइ मजला
गणेशमाते गे, निराधार मी आश्रय न मला ||5||
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै:
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ ||6||
अर्थः-
तुझ्या नामाचे वर्ण (नावात येणारी अक्षरे) कानात नुसती शिरली तरीही,
वायफळ बडबड करणार्‍याची वाणि मधुपाकासमान गोड होते आणि जो रंक आहे तो
चिरकाळ कोटिसुवर्ण(मुद्रा) भोगू लागतो. हे केवळ तुझ्या नामजपाचे फल. पण
तुझ्या अशा या जप करण्यास योग्य अशा जपविधीचा महिमा कोण जाणतो? (कुणीच नाही )
असो कोणी ऐरा,गैराहि हो असूद्या कुणिहि तो
असे बोलू लागे, मधुर मधुरतम किति तो
दरिद्री भोगीतो, नामाक्षर तुझे कानि शिरता
परी ना कळते, जननि तव जपाची महता ||6||

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपति:
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटी फलमिदम् ||7||
अर्थः-
शंकर चिताभस्म लावतात,
वैराग्यास योग्य असं अन्न सेवन करतात, दिगंबर राहतात, जटा वाढवलेल्या
आहेत, गळ्यात भुजंगरूपी हार धारण करतात, पशुपती आहेत, भूतांचे नाथ आहेत-
असे असूनसुद्धा त्यांना सगळे जगदीश म्हणतात.
हे, त्यांनी तुझ्याशी विवाह केला याचंच तर फळ आहे.
चितेची ती रक्षा,फासुनि भिक्षा भक्षि कदन्न तो
दिशेचे ही वस्त्र, पशुपती जटा सर्पहार तो
असे हे असुनि, जगदीश म्हणति लोक तया
तुझा तो पति, याहुनि न अन्य कारण तया ||7||
न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखिसुखेच्छापि न पुनः
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||8||
अर्थ:-
मला मोक्षाची इच्छा नाही, या
संसारात वैभव मिळावे अशी इच्छा नाही, मला विशेष ज्ञान मिळावं अशी अपेक्षा
नाही की चंद्रमुखी स्त्रीचं सुख मिळावं अशीही इच्छा नाही.
म्हणून, हे जननि, माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे, की माझा संपूर्ण जन्म,
तुझ्या आणि शिवाच्या नामस्मरणात जावो.
मराठी रूपांतर
नको आहे मोक्ष, धनसंसारसुखहि पुरले
नसे ज्ञानापाठी, न कधी स्त्रीसुखकाम उरले
आता जावो जन्म, शिवसहित ते नाम जपण्या
मृडाणी रुद्राणी, सक्षम तू असशि हे करण्या ||8||
नाराधितासि विधिना विविधोपचारै:
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभि:
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव
||9||
अर्थः -
मी तुझी विधिवत् उपचारांनी किंवा रुक्षचिंतनपर वचनांनीही आराधना
केली नाही . श्यामे(कालिकामाता) तूच मज अनाथावर तुला उचित वाटेल ती कृपा
कर.
आराधिले न विधिवत् विविधोपचारे
वा रुक्षचिंतन अशा श्लोकपंक्तिद्वारे
हे कालि परि असा भक्त अनाथ मी गे
विनति ही उचित करी कृपाही वेगे ||9||
आपत्सु मग्न: स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि
नैतच्छठत्वं मम भावयेथा:
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ||10||
अर्थः-
हे करुणासागर दुर्गे, आपत्तींमध्ये मी तुझंच स्मरण करतो. यात
कुठलीही लबाडी नाही.
पण तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या लेकराला जशी आईच आठवते, तद्वत मी तुझं
आपत्तींमध्ये स्मरण करतो.
मराठी रूपांतर
आपत्तिमध्ये स्मरतो तुला मी
दयानिधी तू न असत्य मी गे
क्षुधातृषेने जि व्याकूळ बाळं
मातेविना ती स्मरती न अन्या
||10||
जगदम्ब, विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि
अपराधपरम्परापरं न हि माता समुपेक्षते सुतम् ||11||
अर्थः-
आणि हे जगदंबे, माझ्यावर तुझी परिपूर्ण अशी करुणा/कृपा आहे यात नवल ते काय?
कारण मुलाने कितीही अपराध केले तरीही आई त्याची उपेक्षा कधीच करत नाही
मराठी रूपांतर
ना नवल जगदम्बे
मजवरी तुझि गे दया
शतदा पुत्र अपराधी
माता नुपेक्षी तया ||11||
मत्समः पात़की नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ||12||
अर्थः-
हे देवी, माझ्यासारखा पातकी या जगात दुसरा कुणीही नाही. पण हे जितकं खरं
आहे तितकंच हेही खरंच आहे की तुझ्यासारखी पापांचा नाश करणारी दुसरी
कुणीही नाही, त्यामुळे हे माझे भाव जाणून तुला माझ्याबाबतीत जे योग्य
वाटेल ते तू कर.
माझ्यासम पातकी नाही
पापनाशिनी तुझ्यासम
जाणुनि हे महादेवी
योग्य ते करि तू आता ||12||
इति श्रीमत्परमहंस-परिव्राजकाचार्य श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं
देव्यापराधक्षमापनस्तोत्रं सम्पूर्णं
देविच्या क्षमेचे स्तोत्र
आचार्ये रचिले अत्र
चारुचंद्रे मराठिले मात्र
येथ संपूर्ण जाहले
चारुचंद्र उपासनी

No comments:

Post a Comment