About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

चाळीसगाव व्याख्यान


चाळीसगावच्या ८१ वर्षांची परंपरा असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत पुष्प गुंफण्यासाठी, 'हिंदुधर्मातील स्त्रियांचे स्थान' या विषयावर बोलायला दि. १८ जानेवारीच्या भल्या सकाळी मी आणि दादा चाळीसगाव स्टेशनवर येऊन पोहोचलोत. मला अचानक सर्दी खोकल्याचा खूप त्रास सुरू झाला होता..
तिथे श्री. विश्वास देशपांडे यांनी आमचं स्वागत केलं आणि आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेलेत. अल्पोपाहार घेतला आणि  विश्वासकाकांनी आम्हाला एका वेगळ्याच विश्वात नेलं.
चाळीसगाव स्टेशनच्या अगदी बाहेर, एक शतकापूर्वीची भव्य नि आकर्षक अशी दगडी वास्तू आहे. ते आहे जागतिक कीर्तीचे शिल्पज्ञ, चित्रकार अन् छायाचित्रकार, के के मूस यांचं एकेकाळचं निवासस्थान आणि आताचं त्यांच्या अजरामर कलाकृतींचं देखणं संग्रहालय !
तिथे व्यवस्थापक असलेले ऐशीच्या घरातले श्री गायकवाड महोदय चाळिशीच्या  तरुणाला लाजवेल इतक्या उत्साहानं त्या अनमोल कलाकृतींची माहिती सांगू लागलेत. तेथील चित्रांमध्ये आणि कलाकृतींमध्ये लपलेली कलात्मकता उलगडून दाखवू लागलेत.
मूस हे कलाकार इतके कलामग्न होते आणि कलानिर्मितीसाठी त्यांनी स्वतःलाच इतकं स्थानबद्ध करून ठेवलं होतं की जवळ आलेल्या नेहरूंनी त्यांना पाच मिनिटासाठी भेटीस या असा निरोप धाडला असता या स्वाभिमानी कलाकारानं उलट निरोप पाठवला की मी माझी कलासाधना सोडून सहसा कुठेही जात नाही, तुम्ही मला भेटू इच्छित असल्यास माझ्याकडे तुमचं स्वागत आहे. हे ऐकल्यावर नेहरू त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांचं कलावैभव पाहून पाच मिनिटाच्या ठिकाणी त्यांच्या सहवासात त्यांनी एक तास घालवला.
या आणि अशा अनेक आठवणी गायकवाड सरांनी आम्हाला मोठ्या आत्मीयतेने ऐकवल्यात. हीच वास्तू आणि हाच कलावस्तुसंग्रह पॅरिसमध्ये असता तर त्याची केवढी जागतिक प्रसिद्धी झाली असती असा विचार माझ्या मनात आला.
ज्या शाळेच्या आवारात माझं व्याख्यान होतं त्या शाळेचे गायकवाड सर मुख्याध्यापक होते आणि विश्वासकाका त्यांचे विद्यार्थी पुढे विश्वासकाका त्याच शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेत.
गायकवाड सरांना नमस्कार करून आम्ही तिघेही ज्या वाचनालयानं आयोजिलेल्या व्याख्यानमालेत मी पुष्प गुंफणार होते त्या वाचनालयात गेलो.
तिथे वाचनालयाचे प्रमुख श्री अण्णा धुमाळ  आणि अन्य मान्यवर आमची वाटच पहात होते. चाळीसगाव मधील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डाॅक्टर पूर्णपात्रे यांच्या कुशल डाॅक्टरी दृष्टीस माझी अस्वस्थता लगेच दिसली. मला सर्दीच्या त्रासाने घसा बसून बोलणं अवघड झालं होतं. त्यांनी माझं संध्याकाळचं व्याख्यान शक्य कोटीत आणण्यासाठी लगेच औषध योजना केली.
श्री धुमाळ यांनी आम्हाला ते संपूर्ण वाचनालय दाखवलं. पन्नाससहस्र ग्रंथसंपदा असलेलं आणि त्यांचं अद्ययावत् संगणकीय वर्गीकरण केलेलं हे बंकटशेठ वाचनालय ही त्या के के मूस यांच्या कलादालनासारखीच चाळीसगावकरांची अनमोल ठेव आहे हे लक्षात आलं.
तिथून विश्वासकाकांच्या घरी आम्ही जेवायला गेलो. माझ्या वडिलांचा जन्म खानदेशातला, तिथेच त्यांचं लहानपण गेलं, त्यामुळे तिथलं धान्य, भाज्या इत्यादींची त्यांना विशेषच रुची आहे. त्यात देशपांडे काकूंनी अन्नपूर्णेसारखं आम्हाला वाढलं आणि जेवल्याबरोबर थोडीही विश्रांती न घेता विश्वासकाका नि काकू आम्हाला तिथून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका महनीय तीर्थस्थळी घेऊन गेलेत.
चाळीसगावच्या नैऋत्येस पाटणा (पाटण) नावाचं छोटसं गाव आहे. महान भारतीय गणिती, भास्कराचार्यांचं हे गाव. इथेच त्यांनी त्यांचे लीलावती सारखे इतिहास प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेत. पाटणनगरीतून आम्ही एका निसर्गसुंदर अभयारण्यात शिरलो आणि येऊन पोहोचलो थेट अभयदात्री पाटणदेवीच्या, हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या नितांतसुंदर मंदिराशी.! देवळाच्या पाठीमागे सातपुडा पर्वत रांगत आला आहे. त्याच्या उत्तुंग कड्यावरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात फारच छान दिसतो. तिथून पुढे दीड दोन किलोमीटर अंतरावर प्राचीन बौद्ध गुंफा आहेत पण वेळेअभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही.  तिथून निघालो आणि चाळीसगावला असलेले माझे एक श्रोते श्री तरटे यांच्या घरी गेलो. तो पर्यंत माझा घसा चांगलाच बसला होता. चाळीसगावातील होमिओपॅथी तज्ञ डाॅक्टरांनी लक्षणांवरून त्वरित औषध योजना केली आणि काही इच्छाशक्तीचं बळ लाऊन भाषणस्थळी आनंदीबाई बंकट विद्यालयाच्या आवारात मी प्रवेश केला.

इतर कोणत्याही व्याख्यानस्थळापेक्षा हे ठिकाण माझ्यासाठी खूपच विशेष आणि पवित्र होतं. माझे आजोबा वै. राधाकृष्णशास्त्री उपासनी १९४७ या वर्षी या विद्यालयात संस्कृत शिक्षक होते. व्याख्यानाच्या आरंभी मी  तो उल्लेख केला. मी त्यावेळी अगदी भावविव्हल झाले. त्यावेळी विशीत असलेले माझे आजोबा इथेच वावरले असतील या कल्पनेनं मी भारावले. मी सांगू लागले की केवळ एक वर्षच इथे शिक्षक असलेल्या माझ्या आजोबांनी काही विशेष विद्यार्थी घडवलेत. मी म्हणाले 'त्या वर्षी या शाळेत शिकणारा चाळीसगावचा एक बारा वर्षाचा बुद्धिमान विद्यार्थी माझ्या आजोबांकडे पहाटे साडेपाच ते साडेसहा या वेळेत संस्कृत शिकायला येई. हा विद्यार्थी म्हणजेच 'आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अभियंता आणि जलशास्त्रज्ञ ..' असं मी म्हणत असतांनाच श्रोत्यांमधून उद्गार आलेत 'माधवराव .. माधवराव चितळे!'
या एका उत्स्फूर्त उद्गाराव्यतिरिक्त श्रोत्यांमध्ये विलक्षण शांतता नि एकाग्रता होती.
मुंबई पुण्यापासून दूर असलेल्या या छोट्या गावाची सांस्कृतिक परंपरा मोठी आहे आणि लोकांची अभिरुचीही श्रेष्ठ आहे !!
कार्यक्रमानंतर रात्री श्री प्रकाश कुलकर्णी यांच्याकडे खानदेशी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही पुण्याकडे प्रस्थान केलं.
- गीता चारुचंद्र उपासनी.


No comments:

Post a Comment