About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..


'आंग्ल नववर्षाच्या निमित्ताने'; लेखक चारुचंद्र उपासनी.

शिशिराची पानगळ संपते आणि वसंतागम होऊन चैत्रपल्लवी फुलू लागते . निसर्गच जणू कोवळिकीनं जन्म घेतो . हा जन्मोत्सवच आपण चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढ्या उभारून साजरा करतो. अलिकडे तर आपल्या संस्कृती विषयी आस्था असलेल्यांच्या पुढाकारानं अन् नेतृत्वानं अनेक नगरांमध्ये शोभायात्रा काढल्या जाऊन नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातं.
पाश्चात्य नववर्ष तर निसर्गाच्या प्रगाढ निद्रेतच सुरू होतं. पिसारा गळून पडलेला मोर जसा केविलवाणा दिसेल तशीच ती शुष्कपर्ण वा गलितपर्ण वृक्षांनी भकास झालेली भूमी युरोपमध्ये तरी विशेषतः दिसते. मुळातच भीषणगंभीर अश्या या निसर्गस्थितीत मन स्वभावतः उल्हसित होणार तरी कसं ? आणि नववर्षासाठीच्या उत्साहाला ते मन सिद्ध व्हावं म्हणून आधीच्या पूर्वसंध्येपासून ती मंडळी मदिरोन्मत्त होतात आणि एकमेकांच्या मदिराचषकांसह एकमेकांवर आदळतात.
आता दुर्दैवानं आपल्याकडेही हा उन्माद अंधानुकरणानं मोठ्या प्रमाणात होतो.
इकडे आपल्या नववर्षाला मात्र ती चित्रा नक्षत्रातली निसर्गपरी कुठली जादूची कांडी घेऊन येते आणि मग जे होतं ते काव्यरूपात वर्णावसं वाटतं
" वद जादुगारिणी केंव्हा
मारलीस फुंकर कसली
ओसाड माळ हा सारा
पुष्पांनी बहरुनं गेला "
आपण एक करू या
आपलं नववर्ष सुरू होईल तेंव्हाच काय त्या शुभेच्छा देऊ या अगदी आपल्या आणि त्यांच्या नववर्षांच्या या वर्णिलेल्या अंतराला समजावून सांगत लोकांना वळण लाऊ या.
समाजाच्या गुरुस्थानी ज्यांना राहायचं आहे किंवा ज्यांनी राहिलं पाहिजे त्यांनी तरी ही वाट मळवायला हवी.
गतवर्षी मला आंग्लवर्षाच्या इतक्या शुभेच्छा आल्यात की स्वतःहून कुणाला तशा द्यायच्या नव्हत्या तरी त्यांना न प्रतिसादणं हेही सभ्यतेच्या सामान्य संकेतात बसत नसल्यामुळे मला त्या त्या लोकांना त्या द्याव्या लागल्यात. शेवटी एक तत्सम छोटासा संस्कृत काव्यसंदेश वाचला आणि माझ्या छंदाप्रमाणे तो मराठी काव्यात रूपांतरित करून त्या आंग्लनववर्षशुभेच्छांची परतफेड केली ती अशी..
न भारतीयो नववत्सरोSयं
तथापि सर्वस्य शिवप्रद: स्यात् ।
यतो धरित्री निखिलैव माता
तत: कुटुम्बायितमेव विश्वम् ।।
मराठी रूपांतर
न भारतीय नववर्ष हे हो
तरी असो ते सर्वांस शिवप्रद
अहो धरित्री सकलांचि माता
म्हणून झाले विश्वचि कुटुंब
- ©चारुचंद्र उपासनी.
१ जानेवारी २०१८.

No comments:

Post a Comment