About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

नाशिक व्याख्यान, ६ मे २०१६

परवा दि. 6 मे च्या भरदुपारी नाशिकच्या  इंदिरा नगरमध्ये श्री अशोक धर्माधिकारींच्या बंगल्यात मी वडिलांसह त्यांच्याच गाडीतून येऊन पोहोचले. ' नाशिकमध्ये कुणी आहे तुमचं ? ' मला धर्माधिकारी काकूंनी विचारलं
' नाही ' असं मी उत्तरताच
' पण आता आहे ' असं त्या लगेच इतक्या मनापासून म्हणाल्यात की आमच्यातली औपचारिकता अपरिचितता कुठल्या कुठे वितळून गेली. त्यांचा तो कलात्मकतेनं बांधलेला
' रघुनंदन ' हा सुंदर बंगला भोवतीची छायाळ झाडी मी पहात होते. ' फार सुंदर बांधलाय् हा बंगला. अलिकडेच बांधलेला दिसतोय् ' वडील म्हणालेत
' मी अगदी स्वतः बांधलाय् तो. मी सिविल इंजिनिअर आहे. आणि हा बांधून पंचवीस वर्ष झालीत आता.' काका म्हणालेत.
घरातल्या भिंतींवर टांगलेली सुंदर चित्र आम्ही न्याहाळत होतो.
' मीच काढली आहेत ही चित्र '
काका म्हणालेत आणि त्यांच्या घरातल्या चित्रगृहात घेऊन गेलेत.
अनेक निसर्गचित्रं कित्येक क्रांतिकारकांची चित्रं तिथल्या भिंतींवर टांगली होती. तिथे पडलेल्या चित्रसाहित्यावरून काका अजूनही चित्रं काढीत असावेत हे उघड होतं. पंचाहत्तरीतही उत्तम चित्रकलेचा व्यासंग थक्क करणारा होता पण आम्ही खरे थक्क झालोत जेंव्हा काकांनी चित्रकलेला सुरवात केंव्हा केली हे ऐकल्यावर! चित्रकलेची पूर्वी त्यांना किंवा घरात कुणालाच पार्श्वभूमी नसतांना काकांनी सहजच एक्काहत्तराव्या वर्षी कुंचला हातात घेतला आणि मागे वळून न पहाता आता पर्यंत शेकडो उत्तम चित्रं काढलीत. मला तर हा विक्रम गिनेस पुस्तकात नोंदवण्या जोगा वाटतो. काका काकू समर्थभक्तीत इतके रंगले आहेत की त्यांच्या घरातच समर्थ अदृश्यपणे वावरतायत् असा मला भास झाला. त्या दोघांचा, माझ्या वडिलांचा , समर्थांचा आणि त्यांच्या घरातल्या रामरायांचा आशीर्वाद घेऊन रात्री व्याख्यानाला उभी राहिले. दीड तासांनी व्याख्यान संपवून मी खुर्चीवर बसले तेंव्हा उपस्थित श्रोते उभे राहून टाळ्यांच्या कडकडात मला गौरवत होते पण हा गौरव ज्या शिवरायांचं चरित्र मी वर्णित होते त्यांचा, तो थोर इतिहास माझ्या मनावर बिंबवणार्या माझ्या वडिलांचा आणि काका काकूंनी पोटच्या पोरीला द्यावा असा स्नेह देऊन मला जे प्रोत्साहित केलं होतं त्यामुळे त्यांचाही होता.
व्याख्यानानंतर काकूंनी केलेल्या अमृततुल्य स्वयंपाकाचा आणि स्नेहशील आतिथ्याचा आस्वाद घेतला. रात्री झोपतांना वाटलं हे घर ही माणसं यांचा आपला ऋणानुबंध खूप जुना आहे आणि लक्षात आलं पूर्वजन्म मानण्याच्या अनेक कारणांपैकी अशी होणारी भावना हे एक प्रमुख कारण आहे.
सकाळी या ऋषितुल्य दाम्पत्याचा निरोप घेतांना अंतःकरण जड झालं. काकांनी बंगल्याच्या बाहेर पशुपक्ष्यांसाठी बांधलेल्या पाणपोईचं छायाचित्र काढलं. मुक्या जीवांची कणव हे माणुसकीचं पहिलं लक्षण मी मानते. चिमणीसाठी केलेलं एक फळ्यांचं छोटं घरटं आणि काकांनी केलेल्या कवितांचा संग्रह त्यांनी मला भेट दिला. व्याख्याती म्हणून सत्कार करतांना मोगर्याचं डवरलेलं छोटं रोप पण बरोबर घेतलं. मला विश्वास आहे तो मोगरा फुलत राहील आणि वेल गगनाला भिडेल.
 - गीता चारुचंद्र उपासनी.


No comments:

Post a Comment