About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

बडोदा व्याख्यान

दि. 12 नोव्हेंबर 2017 ची सायंकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. प्रथम बडोद्यातील अनोख्या वीर सावरकर स्मारकाला भेट दिली. तिथे सावरकर स्मृतिकेंद्राने माझ्या हस्ते वीर सावरकर आणि नऊ क्रांतिकारकांच्या पुतळयांना  पुष्पांजली अर्पण करण्याचं आयोजन केलं.

नंतर बडोद्यातील महाराणी चिमणाबाई शाळेच्या पटांगणावर 'अध्यात्मवादी सावरकर' या विषयावर माझं भाषण होतं. भाषणं, त्या भाषणांना उत्साहानं आलेले श्रोते, माझ्या भाषणांना लोक देत असलेला प्रतिसाद, कौतुक, इत्यादी गोष्टी मला फारश्या नवीन नाहीत. मला महत्त्व वाटतं ते मी प्रसारित असलेले राष्ट्र अन् धर्म यांच्या गौरवाचे विचार लोकांपर्यंत किती पोहोचतात, त्या विचारांनी ते किती भारावतात, कार्यप्रवृत्त होतात याचं!
या दृष्टीनं ते व्याख्यान लोकांनी उचलून धरलच पण आणखी एका कारणानी मला या व्याख्यानाचं अप्रूप वाटलं..

बडोदं हे माझं आजोळ! त्यात माझी आई माहेरची आसावरी(वीणा) बापट ज्या शाळेची विद्यार्थिनी त्याच शाळेच्या आवारात हे व्याख्यान होतं. ती तिथल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात एम् एस् सी ला गणित विषय घेऊन सुवर्ण पदक मिळवून पहिली आली. माझे आजोबा डाॅ लक्ष्मीकांत बापट आणि आजी सौ मीना बापट हे बडोद्यात संगीत आणि इंजिनियरिंग अशा दोन्ही क्षेत्रात नावाजलेले.
माझे चुलत आजोबा वै.मुरलीधरबुवा उपासनी जे निजामपुरकर नावानं ख्यातकीर्त होते, त्यांची अनेक कीर्तनं बडोद्यात गाजलीत. माझे आजोबा वै. राधाकृष्णशास्त्री उपासनी यांचं त्यांच्या अगदी कोवळ्या वयात 1946 या वर्षी बडोद्यात संस्कृतमध्ये व्याख्यान झालं होतं. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील आणि माझे गुरू श्री चारुचंद्र उपासनी यांचं 'धर्म आणि विज्ञान' या विषयावर अत्यंत प्रभावी प्रवचन झालं होतं इतकं की प्रवचनानंतर श्रोत्यांमध्ये असलेले बडोद्यातील जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित वै. प्रभाकर डोंगरे व्यासपीठाजवळ आलेत आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या प्रवचनाची सकौतुक समीक्षा केली.
या सर्व कौटुंबिक इतिहासाचं दडपण माझ्या मनावर आलं होतं पण कार्यक्रम त्या दडपणाला झुगारून इतका सुंदर झाला की मलाच त्याचा अत्यानंद वाटला आणि माझ्या लक्षात आलं की ज्याला मी माझ्या कौटुंबिक इतिहासाचं दडपण समजत होते ते प्रत्यक्षात होते माझ्या या थोरांचे आशीर्वाद जे मला एरवीही प्रेरणादायी आणि यशदायी ठरतील.

श्री प्रदीप सकपाळ आणि श्री दीपक नाचणकर या दोन सावरकरभक्त तरुणांनी खूप परिश्रम घेऊन हे व्याख्यान आयोजिलं होतं.
बडोद्यातला महाराष्ट्रीय समाज हा सुशिक्षित आणि बौद्धिक, सांस्कृतिक क्षेत्रात पुढारलेला समजला जातो . बडोदेकरांच्या या प्रौढतेचा मला प्रत्यक्ष प्रत्यय आला . शेकडो श्रोते इतक्या तन्मयतेनं अन् इतक्या निस्तब्ध शांततेने व्याख्यान ऐकत होते की जणू तिथे एकाच व्यक्तीशी मी बोलते आहे आणि ती व्यक्ती कानात प्राण ओतून एकचित्तपणे ऐकते आहे. एवढी एकतानता क्वचितच अनुभवायला मिळते.
या तन्मयतेचं, एकतानतेचं श्रेय मी माझ्या वक्तृत्वापेक्षाही अधिक बडोदेकरांच्या श्रोतृत्वाला देते.
दीड तासाच्या माझ्या व्याख्यानानंतर भारावलेल्या श्रोत्यांनी मला अभूतपूर्व दाद दिली.
श्री बच्छाव यांनी समारोपाचं भाषण केलं. त्यांनी केलेल्या कौतुकानं मी भारावून गेले. ते म्हणालेत 'तुमच्या प्रत्येक वाक्याला आमचे हात टाळी द्यायला वर उठत आणि वाक्य संपता संपता ते जोडले जात.' व्याख्यानाला यापेक्षा मोठी दाद ती काय मिळणार!
रूढ कल्पनेतले विज्ञानवादी, बुद्धिवादी, सावरकर माझ्या भाषणातून मी सिद्ध केलेल्या आध्यात्मिक या अंगानेही किती प्रकर्षानं श्रोत्यांच्या मनावर बिंबले आहेत याचा त्यांनी उल्लेख केला.
व्याख्याना इतकाच वेळ नंतर श्रोत्यांनी घेतलेल्या वैयक्तिक भेटींमध्ये गेला. बडोद्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेक मोठ्या व्यक्तींची तिथे भेट झाली. सावरकर साहित्याचे थोर अभ्यासक आणि वक्ते श्री खर्चीकर यांच्याशी नंतर संवाद साधता आला. सावरकर अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक डाॅ नेने उपाख्य दादुमिया तसेच बडोदा विद्यापीठाचे व्हाइस् चॅन्सेलर
यांना व्याख्यान आवडल्याचे त्यांनी नंतर विशेष फोन करून कळवले..
एका धन्यतेचा अनुभव घेऊन मी बडोद्याहून परतले.
खरोखर श्री सकपाळ आणि श्री नाचणकर यांच्या सारखे सावरकरभक्त तरुण प्रत्येक गावात निर्माण झालेत तर गावोगावी अन् घरोघरी राष्ट्रसंजीवक सावरकरविचार पोहोचून देश समृद्ध अन् शत्रुंजयी झाल्यावाचून रहाणार नाही.
 - गीता चारुचंद्र उपासनी.


No comments:

Post a Comment