About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

जबलपूर व्याख्याने वृत्तांत

जबलपूरच्या व्याख्यानांच्या निमित्ताने....

दि. 11 आणि 12 जानेवारी 2018 ला
'अध्यात्मवादी सावरकर' आणि 'हिंदुधर्मातील स्त्रियांचं स्थान' या विषयांवर व्याख्यानांसाठी, दि 10 जाने. ला मी, माझे पिताश्री आणि लहान भगिनी श्रुती यांच्यासह पुण्याहून निघाले.
जबलपूरच्या अलीकडे आम्ही रेल्वेनं नर्मदा ओलांडीत होतो आणि माझ्या इतिहासमग्न झालेल्या मनात, मनश्चक्षूंसमोर महाप्रतापी बाजीरावांच्या सेनापतित्वात लक्ष लक्ष विजयिष्णु तलवारी घेऊन निघालेली ती वीर मराठ्यांची प्रचंड सैन्ये नर्मदा ओलांडतांनाची दृष्ये तरळू लागलीत. या भारावलेल्या मनस्थितीत आम्ही जबलपूरला उतरलो.
श्री प्रशांतजी पोळ यांनी आमचं स्वागत केलं आणि तेथील वास्तव्याच्या ठिकाणी ते आम्हाला घेऊन गेलेत.
संध्याकाळी सात वाजता व्याख्यान सुरू झालं. जबलपुरातील महाराष्ट्रीयांमधले अनेक मान्यवर व्याख्यानाला आले होते. मध्यप्रदेशातल्या या हिंदीबहुल महानगराच्या महापौर डाॅ स्वाती गोडबोले चक्क मराठी आहेत. त्या यजमानांसह व्याख्यानाला आल्या होत्या. व्याख्यानानंतर त्यांच्याशी बोलणं झालं.
तेथील बरेच मराठी बांधव तर काही पिढ्यांपासून तिथे निवसत आहेत. तिथे आणि उत्तरेत इतरत्र पिढ्यांपिढ्या स्थायिक झालेले हे महाराष्ट्रीय म्हणजे उत्तरेत मराठ्यांनी मिळवलेल्या दिग्विजयाची आजही स्पष्ट दिसणारी पदचिन्हे आहेत.
तेथील हिंदीभाषिक, इंग्लिश शब्दांचा जो विचित्र उच्चार करतात, तश्या प्रकारच्या पाट्या वाचून गंमत वाटते. एके ठिकाणी 'आई हाॅस्पिटल' ही पाटी वाचून, मी क्षणभर बुचकळ्यातच पडले मग लक्षात आलं की हे डोळ्यांचं हाॅस्पिटल आहे !
तेथील थोड्याच वास्तव्यात ज्यांच्याशी आमचा स्नेह जुळला ते श्री अनिलकाका राजूरकर आम्हाला म्हणालेत की येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही मंडळींना तुमची आणि तुमच्या वडिलांची भेट हवी आहे, तुमच्याशी ते अगदी अनौपचारिक चर्चाही करू इच्छितात तरी उद्या आपण त्यांच्यासह इष्ट भोजन घेतल्यास हा उद्देश चांगला सफल होईल. तत्पूर्वी मी तुमची सकाळी जबलपुरातील प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्थळांची भेट आयोजित करतो. त्याप्रमाणे सकाळी आम्ही तेथील भेडाघाटावर गेलो. तिघांसाठी एक विशेष नौका घेऊन, तो अतुलसुंदर भेडाघाट पहायला निघालो.
काही दृष्यं, स्थळं अशी अफाट असतात की ती सामान्य माणसाला तरी शब्दांमध्ये वर्णवतच नाहीत. तशी माझी स्थिती तो भेडाघाट पाहून झाली. एखाद्या सुंदर स्वप्नात आपण डोलतो आहोत असच तेव्हा वाटत होतं. दोन्ही बाजूंना उंच उंच संगमरवरी कडे, त्यांची त्या नितळ जळात पडलेली भव्यसुंदर प्रतिबिंबे, निव्वळ अपार्थिव वाटत होती. नर्मदेचं लावण्य जर कुठे शिगेला पोहोचलं असेल तर ते इथेच असावं. नद्यांसाठी असलेली सुंदर सुंदर संस्कृत नावं, तो नर्मदेचा रम्य जलप्रवाह पहाता पहाता मनात येऊ लागलीत. दोन तटांमधून वहाते म्हणून तटिनी, लाटांमधून प्रवाहित होते म्हणून तरंगिणी किंवा उर्मिला (तरंग, ऊर्मी म्हणजे लाट), उताराकडे वहाते म्हणून निम्नगा, पय म्हणजे जल, विपुलजला असते म्हणून पयस्विनी !!
इकडे आम्ही त्या भेडाघाटाच्या मोहकतेत हरवून बसलो होतो आणि तिकडे त्या नावाड्याचं नौकानयन सुरू असतांनाच एक अविरत भाष्य (commentary) सुरू होतं.
भाष्य म्हणजे काय, तर कुठल्या चित्रपटाचं कुठलं चित्रीकरण इथे कसं झालं याचं त्याच्या स्थानिक बोली हिंदीतलं वर्णन. मध्ये एकदा तर त्यानं नौका काहीशी स्थिर करीत, आम्ही अगदी रोमहर्षित होऊ या अपेक्षेनं, वर बोट दाखवीत एक वाक्य शक्य तितक्या नाट्यमयरीत्या उच्चारलं, तो म्हणाला, 'हे हेच ते टोक जिथे करीनाचा दुपट्टा अडकला होता !! '
त्याच्या या फेकलेल्या वाक्याला काहीतरी प्रतिसाद देणं भाग होतं पण माझे वडील दादा म्हणालेत, 'पहा पहा केवढा भव्योदात्त इतिहास आहे या भेडाघाटाचा! प्रत्यक्ष करीनाची ओढणी इथे अडकली होती !!'
यावर आम्ही खळखळून हसलो. पण हे एकंदरीत 'अरसिकेषु कवित्वनिवेदनम्' आहे असा भर्तृहरीसारखा विचार करून तो नावाडी भाष्य थांबवून नुसताच नौकानयन करू लागला पण प्रवाहाच्यामध्येच असलेल्या एका संगमरवरी खडकावर कोरलेलं छोटसं शिवलिंग दाखवीत तो म्हणाला, 'हे शिवलिंग अहिल्याबाई होळकरांची देणगी आहे.' तेव्हा मात्र आम्ही तिघांनी तिथे हात जोडलेत.
नंतर आम्ही चौसष्ठ योगिनी हे प्राचीन मंदिर पहायला गेलो. तिथे मंदिराभोवती शिल्पसौंदर्याची अत्युत्कट सीमा असलेल्या शंभरच्या वर मूर्ती मांडल्या आहेत पण प्रत्येक मूर्ती जिहादी डुकरांनी छिन्न विछिन्न केली आहे.
शिल्पकारांची अदृश्य छिनी आम्हाला मानवाच्या अत्युच्च प्रतिभेचं, निर्मितीक्षमतेचं स्मरण करून देते तर जिहादी डुकरांची अदृश्य छिनी आम्हाला माणसातल्या पिशाच्चांचं स्मरण करून देते. या मंदिराला भेट द्यायला आलेल्यांमध्ये माझं ध्वनिमुद्रित ऐकणाऱ्या काही श्रोत्या अचानक भेटल्यात
या भेटीचा त्यांना आणि मला खूप आनंद झाला.
नंतर रज्जुमार्गानं ( Rope way) आम्ही  तिथला धुवांधार पहायला गेलो. आता ती नर्मदा उतरत्या संगमरवरी खडकांवरून ओसंडून खळाळत, फोफावत आणि रोरावत आदळतांना पहाणं आणि एखाद्या पवित्र मंत्रघोषासारखा तिचा निनाद ऐकत रहाणं, तिच्या मंगल तुषारांतून तनमनाचं मालिन्य घालवीत काळही स्तब्ध झाल्याचा अनुभव घेणं म्हणजे काय आहे हे तिथे गेल्यावाचून कळणार नाही.
ते दृश्य बघून दादा म्हणालेत, 'रेवातीरे तपः कुर्यात्' असं का म्हणतात ते आज कळलं!(रेवा=नर्मदा)
नंतर त्रिपुरासुंदरी मंदिरात दर्शन घेतलं,
संतुलित प्रस्तर (Balancing rocks) हा निसर्गाचा अद्भुत प्रकार पाहिला आणि स्नेहभोजनाला येऊन पोहोचलो.
वीसेक मंडळी आमची वाट पहात होती. त्यांच्या मते हा सावरकरवाड़्मयाच्या प्रचाराचा आणि वीर सावरकरांवर मी करीत असलेल्या भाषणांचा हा उपक्रम मी हिंदीतही करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा मी सुरू केल्यास ते मध्यप्रदेशात वीर सावरकर पोहोचवण्यात सहभागी होऊ शकतील.
12 जाने च्या व्याख्यानानंतर रात्री श्री विलास ताम्हनकर यांच्याकडे भोजनाला गेलो.
दुसऱ्या दिवशी माझी एक ज्येष्ठ आत्येबहीण जी जबलपूरला असते आणि माझ्या व्याख्यानांना जी मोठ्या कौतुकानं आली होती त्या श्रीमती मंगल नाईक या ताईकडे जाऊन आलो.
भोजनासाठी अॅडव्होकेट उदयजी देशमुख यांच्याकडे गेलो. रुचीनं भरलेलं आणि भावनेनं भारलेलं भोजन घेतलं आणि श्री हेमंत ताम्हनकर आणि त्यांच्या बंधूंकडे थोडा वेळ  श्री अनिलकाका आम्हाला घेऊन गेलेत आणि मग जबलपूर स्थानकावर आम्हाला पोहोचवून त्यांनी आमचा निरोप घेतला..
14 जानेवारीला आम्ही घरी आलो तरी जबलपूरच्या आठवणी अजून मनात घोळत आहेत...!
 - गीता चारुचंद्र उपासनी.


No comments:

Post a Comment