About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

२ फेब्रुवारी ची अविस्मरणीय संध्याकाळ !

दि. 2 फेब्रुवारीची अविस्मरणीय संध्याकाळ.

गेल्या पिढीतील ख्यातकीर्त राष्ट्रीय कीर्तनकार कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता समारोहात, दि 2 फेब्रुवारीला सायंकाळी सेवेची संधी मला मिळाली.
'सावरकरांचा अध्यात्मवाद' या विषयावर पुण्यातील नारद मंदिरात माझं व्याख्यान झालं.
या कार्यक्रमाचं निमंत्रण श्री चारुदत्तजी आफळे यांच्या पत्नी सौ. शुभांगी ताई यांनी दोन जानेवारीलाच दिलं होतं आणि माझं व्याख्यान स्वतः आफळेबुवाही ऐकणार आहेत हेही सांगितलं होतं. ते ऐकून माझ्या मनात भला मोठा आनंद आणि भलं थोरलं दडपण अशी संमिश्र भावना दाटून आली..

बुवांचे पिताश्री कै. गोविंदस्वामी आफळे हे सहस्रावधी श्रोत्यांना कीर्तनातील त्यांच्या वक्तृत्वानं देहभान विसरायला लावीत असत. त्यांचे आणि माझे आजोबा कै. राधाकृष्णशास्त्री उपासनी निजामपूरकर यांचे स्नेहाचे संबंध होते. बुवांच्या पत्नी शुभांगीताई, भगिनी क्रांतिगीताताई आणि माझे वडील चारुचंद्र उपासनी हे पूर्व वयात मुंबईत विविध हिंदुत्वकार्यात एकत्र होते त्यामुळे या ठिकाणी येतांना मला एक जिव्हाळा वाटत होता.
बाणभट्टाचं एक वचन आहे.'प्रायेण पुत्राः पितरमनुवर्तन्ते' म्हणजे, सहसा मुलं आपल्या आईवडिलांचं अनुकरण करतात. अवघा महाराष्ट्र कीर्तनांतून ढवळून काढणाऱ्या महान कै. गोविंदस्वामी आफळ्यांसारख्या पित्याचं अनुकरण करणं हे साधं आव्हान नव्हे पण ते समर्थपणे पेलणारे त्यांचे चिरंजीव, आफळेबुवा हे आजच्या पिढीतले श्रेष्ठ कीर्तनकार आहेत. समस्त आफळे कुटुंब मुळातच सावरकरमय, त्यामुळे त्यांच्या समोर सावरकरांच्या या अनोख्या अंगावर व्याख्यान करतांना, एखाद्या तरुणाला अब्दुल कलामांसमोर अग्निबाण तंत्रज्ञानावर भाषण करतांना जे दडपण आलं असतं तसं मला आलं.

हे थोडं झालं म्हणून की काय माझ्या समोर पहिल्याच रांगेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ बसलेले. त्यांना वंदन करून मी व्याख्यानाला आरंभ केला. व्याख्यान चांगलच रंगलं. एखाद्या रंगलेल्या गाण्याच्या मैफिलीत रसिक श्रोते मधून मधून जशी मनापासून दाद देतात तसा अनुमोदक आणि अनुकूल प्रतिसाद श्रोते देत होते.
व्याख्यान झालं अन् पंडित वसंतराव गाडगीळ पुढे आलेत, आणि अस्खलित ओघवत्या पण तरीही सुबोध संस्कृत मधून त्यांनी माझं उदंड कौतुक केलं. माझे चुलत आजोबा थोर कीर्तनकार कै.मुरलीधरबुवा, कै. लक्ष्मणबुवा निजामपूरकर यांच्या रसाळ कीर्तनांच्या स्मृती माझ्या व्याख्यानातून जागृत झाल्याचं पंडितजी म्हणालेत. त्यांनी माझं केलेलं कौतुक हे वाच्यार्थानं न घेता, मी त्या कौतुकाला भविष्यात पात्र ठरावं यासाठी दिलेलं उत्तेजन आहे असं मी मानते.
व्याख्यानानंतर थोडा वेळ बुवांच्या घरी गेलो. तिथे माझे वडील, आफळेबुवा आणि पंडितजी यांच्या छान गप्पा रंगल्यात. क्रांतिगीताताईंनी मला काही मौलिक सूचनाही केल्यात.

3 फेब्रुवारी 2015 या दिवशी उस्ताद झाकिर हुसेन यांच्या अब्बाजीकी बरसी या कार्यक्रमाचं उद्घाटन माझं वेदस्तुती पठण आणि त्यांचे बंधू फजल कुरेशी यांनी म्हंटलेले तालाचे बोल याच्या जुगलबंदीनं झालं होतं.
त्या कार्यक्रमाचा मला इतका आनंद झाला होता की माझ्या मनात प्रश्न आला की असा किंवा याहून अधिक आनंददायक कार्यक्रम यापुढे केव्हा होईल? या प्रश्नाचं उत्तर मला या 2 फेब्रुवारी 2018 च्या नारद मंदिरातील कार्यक्रमाच्या रूपानं मिळालं...
- गीता चारुचंद्र उपासनी.

No comments:

Post a Comment