About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

गीतानुवाद, अध्याय तिसरा.

प्रद्युम्नवाटिका   (शेरूबाग)
अध्याय तिसरा (कर्मयोग)

अर्जुन म्हणाला 

विवेकवती बुद्धी जर का
कर्माहुनही श्रेष्ठ रे ।
घोर अशा या युद्धामध्ये
केशव का मज नेतोस रे ।।३/१

तुझ्या दुहेरी, या कथनाने
गोंधळ मनि किति दाटला ।
एकच काय जे नेमके ते
श्रेयस्कर रे सांग मला ।।३/२

श्रीभगवान म्हणालेत 

दोन प्रकारच्या लोकांच्या या
निष्ठा तुजला सांगितल्या ।
ज्ञानियांनी ज्ञानाने त्या
कर्मिंनि कर्मात आचरिल्या ।।३/३

कर्म न करण्याने रे मुक्ती 
कर्तव्यातुनि न च मिळते ।
कर्म टाकिता अधुरे व्यक्ती
सिद्धी कधिहि न पावते ।।३/४

निसर्ग जीवा मुळीहि क्षणभर
स्वस्थही राहू देत नसे ।
असहाय अशा या स्थितीमध्ये
कर्म न करणे युक्त नसे ।।३/५

केवळ कर्मेन्द्रिये रोखुनी
साधू होण्या जो धजतो ।
विषयांनाही मनात स्मरता
ढोंगी मात्र रे, तो ठरतो ।।३/६

मिळवुनि विजय मनावरी या
कर्तव्यातचि इंद्रिये ।
सोपवुनी जो राही अलिप्त 
पायी त्याच्या सिद्धी ये ।।३/७

क्रियाशून्यतेपेक्षा कितितरी 
' योग्य कर्म ' ते श्रेष्ठ रे ।
कर्मावाचुनि निव्वळ रहाणे
शरिरालाही अशक्य रे ।।३/८

स्वार्थरहित त्या कर्माने रे
मिळते मुक्ती धनंजया ।
कर्मांनी त्या अन्य अशा रे 
रहातो जीव बंधनी या ।।३/९

स्वार्थरहित या कर्मांसहही
निर्मिली देवे ही सृष्टी ।
आणि म्हणाला या कर्माने
व्हावी तुमची हो तुष्टी ।।३/१०

आचरणाने कर्तव्याच्या
होतिल देवही संतुष्ट ।
सुखी करतील तुम्हाही ते
टळेल मोठे वितुष्ट ।।३/११

तुष्ट तुम्हावर होउनि देव
देतिही तुम्हा संपत्ती ।
भोगाल एकटे ठराल चोर
ओढवेल केवढि ही विपत्ती ।।३/१२

पापचि भक्षिति केवळ जे ते
भोगति अवघी संपत्ती ।
सत्कार्यातूनि उरलेली ती
भोगुनि टाळा आपत्ती ।।३/१३

पाऊस निर्मी अन्न आणिक
अन्न पोशिते जीवांसी ।
सृष्टिचक्र हा यज्ञ असे रे
कर्म सहाय्यक ते त्यासी ।।३/१४

कर्मे ती ती असती दैवी
देवे तुजला लावली ।
आचरणाने देवामध्ये
होइल बुद्धि स्थिरावली ।।३/१५

सोडुनि सृष्टिचक्राला त्या 
आचरितो जो अर्जुना । 
निरुपयोगिही असा तो
अर्थ न त्याच्या जीवना ।।३/१६

आत्म्यामध्ये स्वतःच्या जो
रमलेला रे जीव महान ।
कार्य आणिक कर्तव्याच्या
पार असतो भाग्यवान ।।३/१७
(हे वर्णन कोणत्याही क्षेत्रातल्या आत्यंतिक प्रतिभावानास लागू पडतं)

प्रतिभावंताला अशा रे
कर्तव्याचे बंधन नसते ।
कोणावरती त्याचे काही
मुळीच अवलंबित्व नसते ।।३/१८

स्थिती अशी ही येण्यासाठी
अनासक्तिने कर्म करी ।
परमप्राप्तिची इच्छा पार्था
असेल जर का तुझ्या उरी ।।३/१९

आचरणाने अशा सिद्धिला
जनकादिक ते पोहोचले ।
स्थितीत ऐशा येण्यासाठी 
कर्मचि कर तू चांगले ।।३/२०

जसे श्रेष्ठ आचरितो रे
अनुसरती त्या तसेचि लोक ।
मानुनि प्रमाण त्याला ते रे
मार्गे त्याच्या जाती लोक ।।३/२१

त्र्यैलोक्यातहि अवघ्या पार्था
नसे मला रे कर्तव्य ।
तरीहि करितो कर्म सतत मी
नसुनि काहि रे प्राप्तव्य ।।३/२२

तन्द्रि जराशी मला लागली
जाइल थांबुनि मम कर्म ।
येती लोक मागे माझ्या
जाण सकलांचे वर्म ।।३/२३

थांबवले मी कर्म जरि का
होइल गोंधळ केवढा जाण ।
होतिल नष्ट जीव अवघे
जातिल त्यांचे क्षणात प्राण ।।३/२४

करिती कर्मे आसक्तीने
जशी अर्जुना मूढ लोक ।
तशीच कर्मे करि लोकांस्तव
सोडुनि हाव आणिक लोभ ।।३/२५

अज्ञानाने करिती कर्मे
गोंधळ त्यांचा उडवु नये ।
करवुनि घ्यावी ज्ञानाने ती
कर्महीनता आणू नये ।।३/२६

जीवा प्रेरित निसर्ग असतो
कर्मास्तव रे अहर्निश ।
वाटे जीवा तोचि कर्ता
स्वतःस मानी तो ईश ।।३/२७

गुणकर्मांचा चाले खेळ 
तत्त्व जाणितो तो खरा ।
निसर्ग चाले त्यावरती रे
अनासक्त तो खराखुरा ।।३/२८

निसर्गाच्या प्रबळ प्रभावे 
कर्मकचाट्यात सापडतात ।
अज्ञ जीवा ज्ञानियाने
दुखवु नये, ते धडपडतात ।।३/२९

कर्मे सगळी अर्पुनि मजला
व्हावे आध्यात्मिक रे तू ।
टाकुनि मोह सारा तू रे
व्हावे युद्धास सिद्ध तू ।।३/३०

माझ्या या जे विचाराला
अनुसरती ते सदा भले ।
मत्सररहितहि श्रद्धालू ते
कर्मबंधनी मोकळे ।।३/३१

द्वेषग्रस्त जे विचारास या
ठोकरताती सर्वत्र ।
अज्ञानी ते जाण अर्जुना 
मनबुद्धीचे परतंत्र ।।३/३२

आपआपुल्या निसर्गभावे
आचरितो तो ज्ञानीही ।
अवघे प्राणी निसर्गवश ते
निग्रह करि ना काहीही ।।३/३३

विषयात त्यांच्या इंद्रियांना 
आसक्ती अन् द्वेष खरा ।
विघ्न त्यांचे आत्ममार्गी
अधिन न होणे मार्ग खरा ।।३/३४

परकर्तव्य भले जरी ते
कर्म आपले श्रेष्ठ तरी ।
दोषसहित रे असो किती ते
पाळा येई मरण जरी ।।३/३५

अर्जुन म्हणाला 

इच्छा नसतांना रे कृष्णा 
व्यक्ती पापहि आचरिते ।
प्रेरी तिजला सांग कोण रे
बळे तिथे जे लोटिते ।।३/३६

श्री भगवान म्हणाले

रजोगुण हा खुशालचेंडू
राग अन् इच्छा निर्मितो ।
खादाड आणिक पापि भयंकर
जाण तू याला वैरी तो ।।३/३७

जीवाची ही इच्छा म्हणजे 
आरसा धुळीमुळे जसा ।
वारेने तो गर्भ वेष्टिला
धुराने तो अग्नि जसा ।।३/३८

इच्छा वैरिण झाकी ज्ञान
ज्ञान्यांचे ते अर्जुना ।
अग्नीची जशि कधिच तुष्टी
जळून पूर्ण होत ना ।।३/३९

मन बुद्धि इंद्रिय आणिक
इच्छा इथेच राहते ।
या सर्वांना संमोहुनि ती
ज्ञानाला रे झाकते ।।३/४०

म्हणौनि आधी इंद्रियांना 
वशहि करावे अर्जुना । 
श्रेष्ठ ज्ञान नासवणाऱ्या
इच्छेला तू मार ना ।।३/४१

श्रेष्ठ सारी इंद्रिये ती
थोरवी त्याहुनि मनाला । 
श्रेष्ठ मनाहुनि बुद्धी आणिक
सर्वात थोरवी आत्म्याला ।।३/४२

स्थिर तू हो रे बुद्धीने त्या
मान स्वतःला बुद्धीपार ।
इच्छा नामे कठिण शत्रुसी
जिंकावे तू आरपार ।।३/४३

'ॐ तत्सत्' म्हणु या आता
गीता उपनिषदातला ।
कर्मयोग म्हणुनी आता
अध्याय तिसरा संपला ।।
©चारुचंद्र उपासनी.

No comments:

Post a Comment