About the Website

geetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..

जग मिथ्या आहे मग ते खरे का भासते?

आज whatsapp वर एक प्रश्न मला विचारला गेला, आपल्यापैकी सुद्धा काहीजणांना असा प्रश्न उद्भवलेला असू शकतो, किंवा या विषयामधे रुचि असू शकते म्हणून तो प्रश्न व मी दिलेलं उत्तर पोस्ट करत आहे.

प्रश्न ::-
आपलं तत्त्वज्ञान सांगतं की हे जग मिथ्या आहे, भासमान आहे, आत्म्याचा प्रवास हा ब्रह्माचा शोध घेण्यासाठी आहे आणि परमात्म्यात विलीन होणं हे त्याचं साध्य आहे. परंतु आपल्याला तर हे जग खरं वाटतं मग नक्की मिथ्या काय आहे?

उत्तर ::-
जग व्यवहारात सत्य आहे हे शंकराचार्यांनी मान्यच केलय. सत्तेच्या म्हणजे अस्तित्वाच्या 3 पातळ्या असतात,

पहिली, प्रातिभासिक सत्ता!
म्हणजे स्वप्नात किंवा भ्रमासारख्या अवस्थेत जाणवणारं जग, ते खोटं असलं तरी, आपल्या शरीरावर आणि मनावर त्यावेळी होणारा परिणाम खरा असतो.
रस्त्यात अर्धवट दिसलेली दोरी सापासारखी वाटून माणूस घाबरतो तसं.

दुसरी, व्यावहारिक सत्ता!
जागृत अवस्थेमधे स्वप्नावस्थेतलं जग खोटं वाटून किंवा अंधारात साप वाटणारी, खरी दोरी आहे हे लक्षात येऊन त्या भासमान अवस्थेतल्या सुखदु:खातून माणूस बाहेर येतो..

तिसरी आणि अंतिम सत्ता आहे पारमार्थिक सत्ता!
पारमार्थिक म्हणजे परम अर्थानं, श्रेष्ठ अर्थानं असलेली सत्ता, म्हणजे अस्तित्व. या अर्थानं संपूर्ण जग म्हणजे एकाच आत्म्याचे वेगवेगळे आविष्कार आहेत. त्यातला वेगळेपणा हा निव्वळ भास आहे.
शंकराचार्य त्यासाठी लहान मुलाला, खेळण्यातले, लाकडी घोडा, उंट, गाय इत्यादि प्राणी कसे खरे वाटतात त्याचं वर्णन करतात. पण मुलाचे वडील, त्या खेळण्यात रमलेल्या मुलाला उपदेश करतात की तू मोठा होतोयस,. आता ही खेळणी टाक. हे काही खरे हत्ती घोडे नाहीत, हे सगळं निव्वळ लाकूड आहे!
त्याचप्रमाणे ऋषी आपल्याला उपदेश करतात की या विविधतेत भासणा-या सर्व वस्तू म्हणजे एकच आत्मा आहे आणि तो तू आहेस. तत्त्वमसि!! , तत् त्वम् असि!
स्वप्नातून जागा झालेल्याला, स्वप्नातल्या सुखदुःखांचा जसा विसर पडतो आणि तो तुलनेनं अधिक वास्तव अश्या जागेपणीच्या जगात स्थिरावतो, त्याप्रमाणे , याही अवस्थेतून बाहेर पडलेला आणि खरी जागृती आणि बोध झालेला, या आत्ता, आपल्याला वास्तव असलेल्या जगाविषयी उदासीन होतो आणि एका आत्मानंदात शाश्वत आनंद मिळवतो.
आपण सगळेच या व्यावहारिक सत्तेत असल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच पडलेलं हे जगाचं स्वप्न, आपल्यापुरतं खरं वाटतं. पण या स्वप्नाचा भंग झाल्यावरच आपण या जगाला मिथ्या म्हणू शकू.
तोपर्यंत भगवान श्रीराम , लक्ष्मणाला,  "यावन्नपश्येदखिलंमदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत्". 'जोपर्यंत हे अखिल जग मीच व्यापलं आहे असं तुला दिसत नाही तोपर्यंत माझी आराधना कर' हा जो उपदेश करतात तो आपण लक्षात घेतला पाहिजे.. इथे राम म्हणजे आत्माराम आणि लक्ष्मण म्हणजे व्यावहारिक सत्तेतून अजून जागा नं झालेला जीव!
अगदी विज्ञानाचा आधार घ्यायचा झाला तरी, या जगातल्या वस्तू म्हणजे संयुगांची मिश्रणं आहेत, संयुगं मूलद्रव्यांपासून आणि मूलद्रव्य त्यांच्यातील मूलकणांपासून बनली आहेत. आणि ते मूलकण आहेत नुसते ऊर्जेचे पुंज.. quantum theory च्या आधारे आपण असं म्हणू शकतो की हे जग म्हणजे एकाच वस्तूचे निरनिराळे आविष्कार आहेत आणि ती वस्तू म्हणजे ऊर्जा.

ही ऊर्जा नाही अशी एकच गोष्ट, एकच घटना , एकच फेनॉमिनन या विश्वात आहे ते म्हणजे 'मी आहे' ही जाणीव, हे ज्ञान..! आपलं सगळं अध्यात्म हे 'अहमस्मि' या क्षीण अन् संकुचित जाणीवेचं 'अहम् ब्रम्हास्मि' या व्यापक जाणीवेत रूपांतर करण्यासाठी आहे.

या व्यापक जाणीवेच्या उपलब्धीनंतर, बोध झालेला, व्यावहारिक जगातल्या सुखदुःखाकडे तितक्याच तुच्छतेनं बघतो जितका स्वप्नातून जागा झालेला, त्या स्वप्नविषयाकडे!
त्यामुळे हे जग आत्ता आपल्या या अवस्थेत मुळीच मिथ्या नाही. त्याचं मिथ्यापण जाणवण्यासाठी आपल्याला आणखी पलीकडच्या वरच्या अवस्थेत जावं लागणार आहे.. हाच आत्मबोध!!

 -- गीता उपासनी.

No comments:

Post a Comment